औरंगाबाद : प्रसिद्ध गझलकार आणि ज्येष्ठ साहित्यिक इलाही जमादार यांचं निधन झालं आहे. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी गझलेचा आरसा हरवला, अशी प्रतिक्रिया औरंगाबाद येथील गझलकार गिरीश शाम जोशी यांनी दिली आहे. महाराष्ट्र देशाशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ते म्हणतात, ‘जमादार यांनी गझल सम्राट सुरेश भट यांच्यानंतर मराठी गझलेला ध्रुव ताऱ्यागत अढळ स्थान मिळवून दिले. ‘इलाही’ ह्यांच्या रूपाने मराठी गझलेतला एक चमकता तारा निखळला. एक ऋषितुल्य, गुरुतुल्य व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले ह्याचे मोठे दुःख आहे. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्य वर्तुळात एक मोठी पोकळी निर्माण झाली. ‘बडे दिलवाला’ आदमी काय असतो हे इलाही सरांकडे बघून समजते.
इलाही जमादार हे आकाशवाणी व दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी होते. मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून त्यांच्या रचना प्रसिद्ध होत असत. कवी, गीतकार, लेखक, गझलकार, शायर अशा विविध भूमिका त्यांनी साकारल्या. नवं लेखकांना गझलेचे मार्गदर्शन ते आनंदाने करायचे. अनेक चित्रपट, मालिका, टेलिफिल्मससाठी त्यांनी गीतलेखन केले आहे. मोठमोठ्या व्यापीठांवरून त्यांचे कविता व गझल वाचन झाले आहे.
एक जखम सुगंधी, शब्द सुरांची भावयात्रा, स्वप्न तारकांचे, भावनांची वादळे इत्यादी मराठी गझल त्यांच्या नावावर आहेत. तसेच मुक्तक, दोहे इलाहीचे इत्यादी दर्जेदार ग्रंथ संपदा त्यांनी रसिकांना बहाल केली आहे. इलाही सरांच्या काही ओळी कधीच विसरता येणार नाहीत..
”अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा!
वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे?
पुस्तकातून भेटलेली माणसे गेली कुठे?
ही अचानक माणसांची माकडे झाली कशी?
माणसाच्या चेहऱ्याची माणसे गेली कुठे?
हे असे बागेवरी उपकार केले
कत्तली करुनि फुलांचे हार केले..
पाहुनी तुजला चितेवरती ‘इलाही’
तारकांनी अंबारी जोहार केले.
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला,
केलेत वार ज्याने तो मोगरा असावा..”
वेदनेचे संगीत ऐकणारा माणूस आज आपल्यातून निघून गेला आहे, अशी प्रतिक्रिया गझलकार गिरीश जोशी यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील दुधगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या जाण्याने गझल विश्वात शोककळा पसरली आहे. इलाही जमादार यांचा जन्म 1 मार्च 1946 साली सांगतीलीत दुधगावात झाला. लोकप्रिय दिग्गज गझलकार सुरेश भटांच्या नंतर इलाही जमादार यांच्या नावाचा उल्लेख होत असे.
महत्वाच्या बातम्या
- एक असाही छंद : बारवांचा शोध घेण्यासाठी रोहन फिरतोय रानोमाळ
- ग्राहक मंचाचा एसबीआयला दणका, रक्कम व्याजासह देण्याचे आदेश
- गांधी स्मृतिदिनी अमेरिकेत पुन्हा महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना…
- ‘ऊर्जा खात्याला तातडीने 10 हजार कोटी द्या नाही तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लवकरच अनावरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

