औरंगाबाद: बीड या ठिकाणी आपल्या कारमध्ये पिस्तूल सापडल्या प्रकरणी त्यावेळी आपल्याला अटक झाली होती. जेल मधील तो दिवस आपण कधीही विसरणार नाही. पती सत्ताधारी पक्षात असल्याने सगळीकडून माझा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असा आरोप करत असतानाच करुणा मुंडे(Karuna Munde) यांना जेलमधील तो दिवस आठवतांना अश्रू अनावर झाले होते. तसेच शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे घराणेशाही संपवली त्याचप्रमाणे आपण राजकीय घराणेशाही संपवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात करुणा मुंडे हे नाव मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांच्या त्या पत्नी आहेत. धनंजय मुंडे सोबत बंड करून त्यांनी काही दिवसांपूर्वी शिवशक्ती सेना हा नवा पक्ष स्थापन केला आहे. मोठ्या प्रमाणावर या पक्षाचे काम त्यांनी सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात या नव्या पक्षाची पहिलीच बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. बैठक घेतल्यास कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी दिला होता. बैठकीला परवानगी नाकारल्यानंतर करुणा मुंडे यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी लोकशाहीप्रधान देशात सत्ताधाऱ्यांकडून एका महिलेला कशा प्रकारे दडपले जात आहे असा गंभीर आरोप केला.
पत्रकार परिषदेत काय म्हणाल्या मुंडे?
औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुंडे म्हणाल्या शिव शक्ती सेना या आपल्या नवीन पक्षाच्या बांधणीसाठी राज्यभरात दौरे सुरू केले आहेत. या निमित्ताने जवळपास २५ वर्षांनंतर आपण घराबाहेर पडल्याचे देखील त्या म्हणाल्या. आपल्या पक्षाच्या माध्यमातून महिला शेतकरी ऊस तोड कामगार यांचे प्रश्न आपण सोडणार आहोत. यासाठी कार्यकर्त्यांचे जाळे उभे करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी घराणेशाही संपवली त्याचप्रमाणे आपण राजकीय घराणेशाही संपवणार आहोत असे म्हणत त्यांनी थेट पती धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.
महत्त्वाच्या बातम्या


