टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. अशातच गणेश नाईक यांनी ५० पेक्षा जास्त नगरसेवकांना घेवून पक्षाला रामराम ठोकला आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते नाईक आव्हाड यांनी यांच्यावर टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ‘नाईक यांनी पक्षाची वाट लावली. कल्याण, मीरा-भाईंदर व भिवंडीत पक्ष संपवला,’ असा आरोप केला तसेच ‘राष्ट्रवादी पक्षाने व शरद पवार यांनी नाईकांवर कसा व किती विश्वास टाकला, हे सांगितले. नाईकांच्या घरातील सर्वांना राष्ट्रवादीनं पदं दिली. पण नाईकांनी पक्षासाठी काहीही केले नाही. असंही आव्हाड म्हणाले.

तसेच त्यांना २०१४ सालीच पक्ष सोडायचा होता. मी माझ्या नेत्यांच्या ते लक्षातही आणून दिलं होतं. मात्र, त्यांचा नाईकांवर जास्त विश्वास होता. अखेर आज नाईकांचा लबाड चेहरा समोर आला अशा शब्दात आव्हाड यांनी नाईक यांच्यावर तोफ डागली. नाईक यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे भगदाड पडले आहे.
दरम्यान, गणेश नाईक भाजपमध्ये येत असल्याचं समजल्यापासून मंदा म्हात्रे त्यांना शिव्या घालत आहेत. तरीही ते लाचारासारखे तिकडे जाताहेत आणि हे स्वाभिमानाच्या गोष्टी करतात. आम्हाला त्यांच्या जाण्यानं काहीही फरक पडत नाही. राष्ट्रवादी पुन्हा मोठ्या ताकदीनं उभी राहील असंही आव्हाड पुढे बोलताना म्हणाले.


