🕒 1 min read
सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या हाहाकाराला आता महिना उलटला आहे. सांगली, कोल्हापूरसह साताऱ्यात देखील पुराने थैमान घातले होते. २०१९ च्या महापुरानंतर पुन्हा एकदा आलेला मोठा पूर, गेल्यावर्षीपासून कोरोनाने घातलेले थैमान अशा सलग ३ वर्षांच्या मोठ्या संकटांमुळे स्थानिकांनी हतबलता व्यक्त करत सरकारकडून मोठ्या मदतीची अपेक्षा केली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर तात्काळ मदतीसह पुराचा धोका टाळण्यासाठी दुरोगामी निर्णय घेण्याची गरज असल्याचे सांगितले होते. यासाठी पूररेषेतील अतिक्रमणांसह पुराचा धोका अधिक असलेल्यांचे पुनर्वसन करण्यासारखे निर्णय देखील घेणार असल्याचे ठाकरेंनी जाहीर केले होते. मात्र, आता पूर येऊन महिना उलटल्यानंतर सांगलीमध्ये आज पुरबाधितांनी आंदोलन करत राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांना लक्ष्य केलं.
‘कृष्णा नदीच्या महापुराचे संकट संवेदनशीलतेने हाताळण्याची गरज आहे. सांगलीबाबत जयंत पाटील यांचा जुना रोष पाहता सर्वांनाच शंका वाटते. त्यामुळे जलसंपदा खाते मुख्यमंत्रीठाकरे यांनी स्वतःकडे घ्यावे. जयंतरावांना करेक्ट कार्यक्रम करण्याची आवड आहे. त्यांना सांस्कृतिक कार्यमंत्री करावे,’ अशी उपरोधिक टीका सर्वोदय कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी या आंदोलनावेळी केली.
यावेळी, ‘कोरोनात अपयशी, महापुरात तोंडघशी’ अशा घोषणा देखील देण्यात आल्या. पुढे पवार म्हणाले, ‘२०१९ च्या निकषानुसार पूरग्रस्तांना मदतीचे धोरण राबवायला हवे होते, मात्र इथली स्थिती कॅबिनेटपर्यंत प्रभावीपणे पोहचत नाही. मंत्री अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनात जिल्ह्याची दयनीय अवस्था आहे. महापुराने जगणे असह्य केले आहे. दोन्ही संकटांत पालकमंत्र्यांचे चुकलेले नियोजन कारण ठरले आहे. या संकटाची जबाबदारी त्यांनी स्विकारली पाहिजे. त्याउलट अभिनंदन, सत्कार होताहेत. लोकांच्या जखमेवर मीठ चोळले जातेय,’ अशी टीका पवार यांनी केली.
तर, ‘महापूर रोखण्याच्या विषयात कागदी विमाने हवेत उडवली जात आहेत. नदीला भिंत बांधण्याआधी इस्लामपूर-सांगली रस्ता करा. पंचगंगा नदी वळवण्याआधी शेरीनाल्याचा प्रश्न सोडवा. मूळ विषयापासून लक्ष विचलित केले जातेय. त्यांच्याकडून ही जबाबदारी पेलवणारी नाही,’ असा घणाघात पृथ्वीराज पवार यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- निर्बंध शिथिल झाल्यानंतर मास्कचा वापरही झाला कमी, मास्क विक्रीत मोठ्या प्रमाणावर घट
- ‘शिवसेना सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात ती शिवसेनाच राहील ,तुम्ही मर्यादा ओलांडली तर..’, राऊतांचा इशारा
- लाल चिखल! राज्य सरकारने सर्कस बनून शेतकऱ्यांसमोर विदूषक म्हणून नाचू नये-सदाभाऊ खोत
- जन आशीर्वाद यात्रेला विरोध केला तर जशास तसं उत्तर देणार – प्रमोद जठार
- अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार; राज्य सरकार ‘ती’ कागदपत्रे सीबीआयला देणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
