मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा करण्याची चढाओढ लागल्याच पाहायला मिळत आहे. आधी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कॉंग्रेस राज्यात स्वबळावर लढणार असून आपण मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले नंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी देखील भाजप राज्यात स्वबळावरच लढणार असल्याच जाहीर केले.
या दोन पक्षांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना एकत्र लढली तर महाराष्ट्रात चमत्कार घडेल अशी प्रतिक्रिया दिली होती. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली होती. ‘महाविकास आघाडीत 3 पक्ष आहेत. या 3 पक्षांनी एकत्र राहावं याला सगळ्यांनी प्राधान्य दिलं पाहिजे. काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्र राहतील. महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसत आहे,’ असं विधान केलं होतं.
आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेसह जयंत पाटील यांचा देखील समाचार घेतला आहे. ‘स्वबळाचा नारा केवळ काँग्रेसनंच नाही तर शिवसेनेनंही दिला आहे. पण फक्त काँग्रेसला टार्गेट करण्याचं काम सुरु आहे. मी सामना वाचत नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा? कुणी आमच्यावर टीका करत असेल तर आम्ही त्याला महत्व देत नाही. आम्ही जयंत पाटील यांनाही शुभेच्छा देतो की, त्यांनी शिवसेनेसोबत युती जाहीर करुन टाकावी,’ अशा शब्दांत नाना पटोले यांनी आव्हान दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘परिवर्तनाची वेळ आलीये ? उद्धवजींच्या मनातलं फक्त रश्मीवहिनींनाच माहित असेल’
- राजकीय भूकंपाची नांदी ? दिल्लीत शरद पवारांचे प्रशांत किशोरांसोबत खलबतं
- ‘आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही, शिवसेनेत फक्त बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट’
- ‘आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा असेल तर कुणाला त्रास का व्हावा?’; काँग्रेसचा शिवसेनेवर पलटवार
- पुण्यात तुफान गर्दी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक


