🕒 1 min read
बीड : बीडच्या गेवराई तालुक्यात एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने पतीची गळा आवळून हत्या केली. मात्र, पोलिसांना पतीने आत्महत्या केल्याचे सांगत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतू शवविच्छेदन अहवालातून गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे. गेवराई तालुक्यातील संगम जळगाव येथे ही खळबळजनक घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली होती.
पोलिसांच्या माहितीनुसार, राजकुमार आश्रुबा बडे (५१) असे मृत पतीचे नाव आहे. ते मूळचे धारुर तालुक्यातील असून गेवराईतील संगम जळगाव ही त्यांची सासरवाडी आहे. दि. २४ फेब्रुवारी रोजी ते संगम जळगावला आले होते. रात्री साडेनऊ वाजता सासरवाडीतील घरापासून काही अंतरावर ते मृतावस्थेत आढळले. तेथे त्यांची सासू व पत्नी मीराबाई या दोघी होत्या. राजकुमार यांचा मुलगा घटनास्थळी पोहोचल्यावर त्याने त्यांना ताबडतोब रुग्णालयात हलविले. परंतु डॉक्टरांनी तपासणी करुन मृत घोषित केले.
दरम्यान, उत्तरीय तपासणीनंतर कुटुंबीयांना राजकुमार यांच्यावर अंत्यसंस्कार केले. चौकशी दरम्यान राजकुमार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा केला. परंतु शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू गुदमरल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांना संशय आला. शिवाय पंचनाम्यात मृत राजकुमार यांच्या गळ्याला जखमही आढळून आली होती. यावरुन हा घातपात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी सखोल चौकशी करण्याचा प्रयत्न केला. परंतु नातेवाईकांनी तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणात सरकार पक्षाकडून हवालदार विठ्ठल देशमुख यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी पत्नी मीराबाई हिला अटक करण्यात आली आहे.
या कारणामुळे केली हत्या
सासू-सासऱ्यांना मूल नसल्याने संगम जळगावची सहा एकर जमीन राजकूमार यांच्या पत्नीला वारसा हक्काने मिळणार होती. त्यामुळे वडिलोपार्जित सर्व जमीन दोन भावांना देऊन सासरवाडीतील जमीन कसून त्यावर उदरनिर्वाह करू असे राजकुमार यांचे म्हणणे होते. मात्र, वडिलोपार्जित जमिनीतील हिस्सा घ्यावा असा पत्नीचा हट्ट होता. यातून पत्नीने राजकुमार यांना संपविल्याचे पोलिसांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- धनंजय मुंडेंनी केली मागणी, आदिती तटकरेंकडून तत्काळ पूर्तता
- खळबळ! मनसेमुळे जमीन बळकावणाऱ्या बीडमधील ‘प्रतिष्ठितां’वर गुन्हा
- तर औरंगाबादमधील ‘हा’ भाग होणार लॉकडाऊन
- ‘या’ कारणामुळे भाजप आ.राणा पाटील नाराज, मंत्री अमित देशमुखांना लिहिले पत्र
- ‘तेरणा, तुळजाभवानी’साठी संसदेमार्फत प्रयत्न करू, शरद पवारांचे आश्वासन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
