मुंबई: आज १ मे रोजी महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. ही सभा महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर होणार असून या सभेसाठी राज ठाकरे कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, त्यांच्या या सभेवरुन सत्ताधाऱ्यांनी त्यांना धारेवर धरण्यास सुरुवात केली असताना पहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरेंवर टीका केली.
हिंदुत्वाच्या मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर घणाघात केला. “अशा खेळाडुंकडे मी लक्ष देत नाही, हे खेळाडू नेमक्या कोणत्या-कोणत्या मैदानात कोणते-कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवलं आहे. कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ, असे खेळ महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहेत. दोन वर्षांचा कालखंड फार मोठा होता. यादरम्यान सर्व बंद होतं. मग करमणूक फुकटात मिळत असले तर का नाही पाहायची? सध्या मार्केटिंगचा जमाना आहे, नाही पसंत पडलं तर परत करा, तसं हे तुमचं फळलं तर फळलं नाहीतर परत, असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप पाहिलेत”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली.
“भोंग्यांचा विषय गाजलेला वाटत नाही. मला माझ्या जनतेच्या जिवाची पर्वा आहे. केंद्राने भोंग्याबाबत धोरण ठरवावं. राज ठाकरेंचा अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न आहे. हिंदूत्वाचा डंका आम्हाला वाजवावा लागत नाही. शिवसेनेने कधीचं झेंडा बदलला नाही”, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

