अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- मराठा आरक्षणासाठी राज्यात निघालेले लाखोंचे मोर्चे व बलिदान व्यर्थ जाणार नाही. आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असताना, राज्य सरकारने येत्या आठ दिवसांत मराठा आरक्षण संदर्भात अध्यादेश काढावा अन्यथा मंगळवारी २२ सप्टेंबर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, बुधवारी २३ सप्टेंबर जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व गुरुवारी २४ सप्टेंबर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा शेतकरी मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे. शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे यांनी याबाबत माहिती दिली.
दहातोंडे म्हणाले की, मराठा आरक्षण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय मेहनत घेऊन कोर्टात टिकेल असे तयार केले होते. परंतु या तिघाडी सरकारने अभिषेक सिंघवी, कपिल सिब्बल असे अमराठी व काँग्रेस विचारांचे वकील नेमून मराठा समाजाचे नुकसान केले आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ५२ मोर्चे काढले, तर ५० समाज बांधवांनी बलिदान दिले आहे.
मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणला न्यायालयात महाविकास आघाडी सरकारच्या बेजबाबदार पणामुळे स्थगिती मिळाली आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही. हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. असे दहातोंडे म्हणाले.अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी मराठा आरक्षण संदर्भात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ व शेतकरी मराठा महासंघाच्या पदाधिकार्यांची झुम अॅपवर ऑनलाईन बैठक झाली.
यावेळी उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गवांदे, दक्षिण जिल्हाध्यक्ष बिभीषण खोसे, सचिव सुनील चौधरी, रावसाहेब मरकड, नानासाहेब डोंगरे, भाऊसाहेब वाकचौरे, ज्ञानेश्वर फसले, जिल्हा उपाध्यक्ष विकास नरवडे, बाळासाहेब कोकाटे, अनिकेत कराळे, सतीश पठाडे, संतोष हंबरे, सुनील निमसे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:-
- गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध लढा उभारावा, अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावं – आंबेडकर
- एका महिलेने वाघाची शेळी केली, भाजप नेत्याचा घणाघात
- साईमंदिर खुले करा, मनसेचे शिर्डीत आंदोलन!
- सोलापूर पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई, 10 जणांना अटक
- केंद्र सरकार ढासळती अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीच्या मुद्यांवरुन पळ काढत आहे- खा.सुप्रिया सुळे


