मुंबई – पश्चिम बंगाल जिंकण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाल्यानंतर आता भाजपाच्या पक्षसंघटनेला बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. पक्षाचे राज्यातील दिग्गज नेते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी केल्यानंतर आता भाजपाला बंगालमध्ये अजून तगडा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाचे बंगालमधील एक खासदार आणि तीन आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
मुकुल रॉय यांच्या पक्षप्रवेशाचे पडसाद आता महाराष्ट्रात देखील पडू लागले असून भाजपला महाराष्ट्रात काही धक्के बसण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचा दावा कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दावा केला आहे की, भारतीय जनता पक्षातील अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारणात राजकीय भूकंप कॉंग्रेस घडवणार का ? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
भाजपमध्ये गेलेली नेतेमंडळी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची आपल्याकडे मोठी यादी आहे, पण आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवलं जाईल, असंही पटोले यांनी स्पष्ट केले आहे. नाना पटोले यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
काँग्रेस प्रवेशासाठी इच्छुक असलेले ते भाजप नेते कोण? असा सवालही विचारला जात आहे. सोबतच पटोले यांचा दावा खरा आहे की नुसतीच धूळफेक आहे या बाबत देखील उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. जर पटोले यांचा दावा खरा असेल तर मग पटोले पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम उरकून घ्यायला नेमकी कशाची वाट पाहत आहेत हा देखील एक मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे.
ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष आहेत त्या ठिकाणी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे.कॉंग्रेसच्या इतिहासात कधी नव्हे एवढी बिकट परिस्थिती कॉंग्रेसवर ओढावली आहे.अनेक दिग्गज नेते पक्षात भविष्य दिसत नसल्याने साथ सोडत आहेत. हे वास्तव समोर असून देखील सध्या कॉंग्रेस राज्यात स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याचे पटोले सांगत आहेत.
एकंदरीत देशभरातील कॉंग्रेसची होत असलेली वाताहत पाहता स्वबळावर कॉंग्रेसला फार यश मिळेल अशी स्थिती नाही. महाविकास आघाडीत ते निवडणूक लढवणार असते तर वेगळी गोष्ट होती मात्र स्वबळावर फार यश मिळणार नाही हे भाकीत अनेक जाणकार करत आहेत. ठाकरे सरकारमधील कॉंग्रेसचे स्थान हे देखील काय आहे हे सर्वाना ठाऊक आहे. मग अशा परिस्थितीत नेमके कोणते नेते फक्त कॉंग्रेसवर भरोसा ठेवून राजकीय भवितव्य पणाला लावणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळे पटोले यांनी केलेला दावा किती खरा आणि किती खोटा हे आगामी काळात स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या
- ‘धनंजय मुंडे हे माझे पती आहेत आणि मी माझ्या पतीच्या पैशातूनच समाजसेवा करत असते’
- श्रीलंका दौऱ्यासाठी निवड न झाल्याने निराश खेळाडूची भावनिक पोस्ट
- ‘सीएसकेचा सदस्य होणे ही सकारात्मक बाब’, श्रीलंका दौऱ्यावर निवड झालेल्या ‘या’ खेळाडुने मांडले मत
- ‘साराने माझ्याकडे हात जोडून काम मागितलं’, रोहित शेट्टीचा खुलासा
- मी नेमकी कितवी पत्नी आहे हे सत्य लोकांसमोर येवू नये म्हणून माझ्यावर बंधने आणली गेली – करुणा मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

