IPL 2022 MI vs CSK : महेंद्रसिंह धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल..! मुंबईचा सलग सातवा पराभव

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज ‘एल क्लासिको’ म्हटल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI vs CSK) यांच्यात रोमहर्षक सामना रंगला. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात शेवटच्या ४ चेंडूत १६ धावांची गरज असताना महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) जयदेव उनाडकटवर आक्रमण करत सामना मुंबईच्या हातातून खेचून घेतला. आयपीएल इतिहासात सलग सात सामने गमावणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला आहे.

चेन्नईचा कप्तान रवींद्र जडेजाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. तिलक वर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने चेन्नईला १५६ धावांचे आव्हान दिले. मुकेश चौधरीच्या (१९ धावांत ३ बळी) भेदक माऱ्यामुळे मुंबईची वरची फळी उद्ध्वस्त झाली. प्रत्युत्तरात मुंबईकडून डॅनियल सॅम्सने ३० धावांत ४ बळी घेत सामन्यात रंगत निर्माण केली, पण शेवटच्या षटकात धोनीने सामना हिरावून घेतला. चेन्नईने ३ गडी राखून स्पर्धेत दुसरा विजय नोंदवला.

चेन्नईचा डाव

मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खूप खराब झाली. मुंबईचा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सने पहिल्याच चेंडूवर ऋतुराज गायकवाडला तंबूचा मार्ग दाखवला. वरती बढती मिळालेल्या मिचेल सँटनरलाही (११) सॅम्सनेच बाद केले. रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायुडू यांनी अर्धशतकील भागीदारी केली. जयदेव उनाडकटने उथप्पाला (३०) बाद करत ही भागीदारी मोडली. त्यानंतर सॅम्सने रायुडू आणि शिवम दुबेलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत चेन्नईला संकटात टाकले. रायुडूने २ चौकार आणि ३ षटकारांसह ४० धावा केल्या. कप्तान रवींद्र जडेजाही संघाच्या शतकानंतर बाद झाला. महेंद्रसिंह धोनी आणि ड्वेन प्रिटोरियस मैदानात असताना शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १७ धावांची आवश्यकता होती. जयदेव उनाडकटच्या षटकात धोनीने २ चौकार आणि एक षटकार ठोकत सामना फिरवला. धोनीने १३ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २८ तर प्रिटोरियसने १४ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह २२ धावा केल्या. मुंबईकडून उनाडकटने २ बळी घेतले.

मुंबईचा डाव

चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने भेदक स्पेल टाकत मुंबईला दु: खद सुरुवात करून दिली. त्याने पहिल्या तीन फलंदाजांना बाद केले. रोहित शर्मा आणि इशान किशन शून्यावर तंबूत परतले. मुकेशने इशान किशनचा भन्नाट यॉर्करवर त्रिफळा उडवला, तर रोहित आणि डेवाल्ड ब्रेविसला (४) झेलबाद केले. त्यानंतर सूर्यकुमारने ३ चौकार आणि एका षटकारासह ३२ धावांची खेळी केली, पण मिचेल सँटनरला चुकीचा फटका खेळताना बाद झाला. त्यानंतर पदार्पणवीर ह्रतिक शोकीन यांनी संघासाठी महत्त्वपूर्ण धावा केल्या, शोकीनने २५ धावांची संयमी खेळी केली. १४व्या षटकात त्याला ड्वेन ब्रावोने बाद केले. १५व्या षटकात मुंबईने शतक साकारले. त्यानंतर तिलक वर्माने संघाचा दबाव दूर करत धावा जोडल्या. या सामन्यात चेन्नईने सुमार श्रेत्ररक्षण केले. तिलकने १९व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकात मुंबईने १६ धावा कुटल्या. २० षटकात मुंबईने ७ बाद १५५ धावा केल्या. मुकेश चौधरीने १९ धावांत ३ बळी घेतले. ब्राव्होने २ फलंदाजांना माघारी धाडले.

दोन्ही संघांची Playing 11

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, हृतिक शोकीन, रिले मेरेडिथ, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह.

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कप्तान), एमएस धोनी (यष्टीरक्षक.), ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन ब्राव्हो, मिचेल सँटनर, महेश थिक्षना, मुकेश चौधरी.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com