पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा गडावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्या १३ फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या हस्ते या पुतळयाच उद्घाटन होण्याआधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलं. यावेळी पडळकरांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत विखारी टीका केली. ‘शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे. अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत. त्यामुळे युवामित्रांच्या साथीने जेजुरीतील अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आलो’, असंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.
यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जेजुरीतील कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले. तसेच शरद पवार यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केले म्हणून गोपीचंद पडळकरांचा निषेध यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
याप्रसंगी पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, पुरंदर तालुक्याचे माजी आमदार अशोक टेकवडे, जेजुरी नगर पालिकेचे विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज भैया जाधव, पुरंदर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष संदेश पवार व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘मी गमतीने म्हणालो होतो ईडी लावली तर सीडी लावेन…पण आता खरच सीडी लावावी लागेल’
- पक्षात माझा जीव गुदमरतोय म्हणत ममतांच्या खासदाराचा राजीनामा, तृणमूलला गळती सुरूच
- पडळकरांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण केल्याचा दावा गृहमंत्र्यांनी फेटाळला !
- ममता बॅनर्जींबाबत अमित शाह यांनी केलेलं ‘ते’ भाकीत खरं ठरणार ?
- ‘अक्कल गहाण ठेवलेला किंवा नशा करणारा माणूसच मोदींना डरपोक बोलू शकतो’


