औरंगाबाद : रस्त्यांचे सिमेंट क्राँकिटीकरण केल्यानंतर आता महापालिकेने शहरातील इतर रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिका बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेल्या शंभर कोटीपैकी कोटीच्या निधीतून ३१ किलोमीटर अंतराचे ३९ रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला असून तो आयुक्तांकडे मंजूरीसाठी सादर केला जाणार आहे, अशी माहिती शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी शुक्रवारी (दि.११) दिली.
औरंगाबाद शहरातील रस्त्यांची दयनिय अवस्था झाली होती. मात्र या रस्त्याच्या कामासाठी निधी नसल्यामुळे पालिकेने राज्य सरकारकडे मागणी केली. राज्य सरकारकडून मागील पाच वर्षांत २७७ कोटींचा निधी मिळाला. या निधीतून ५८ रस्त्यांची व्हॉईट टॉपिंग व डांबरीकरणाची कामे करण्यात आली. त्यामुळे पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी आता इतर रस्त्यांच्या कामासाठी सरकारकडे निधी न मागता पालिकेच्या निधीतून त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी पालिकेच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये शंभर कोटीची तरतूद केली. व्हॉईट टॉपिंगसाठी होणारा दुपटीचा खर्च आणि पर्यावरणावर त्याचा होणारा परिणाम लक्षात घेऊन आयुक्तांनी पहिल्या टप्प्यात ४० रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रस्त्यांची निवड करून त्याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश शहर अभियंता यांना दिले.
शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता बी. पी. फड व त्यांच्या सहकार्यांनी ३९ रस्त्यांची निवड करुन त्यासाठी लागणार्या ५७ कोटी १० लाख १४ हजार १५ रुपयाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यासाठी सहा भागांमध्ये रस्त्यांची यादी तयार केली आहे. हे अंदाजपत्रक आयुक्त पांडेय यांच्याकडे मंजूरीसाठी सादर केले जाणार असून त्यांनी रस्त्यांमध्ये बदल सुचविल्यास तो देखील करण्यात येऊन निविदा प्रक्रिया राबविली जाईल, असे पानझडे यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादेतही ‘लसी’नं झपाटलं…अंगाला स्टील चिटकलं, चुंबकत्व चमत्काराचा मात्र होतोय इन्कार!
- पर्यटनाच्या राजधानीत झक्कास पठाराला वेग, सारोळा येथे अडीच हेक्टर वर बीजारोपण
- नियमांचे पालन आणि लसीकरणात वाढ हाच उपाय, आ. दानवे यांचा कोरोना मुक्त गाव मोहिमेत पुढाकार
- आधारकार्ड नोंदणी ऑनलाईन कामासाठी सवलत देण्याची अल्पसंख्यांक संस्था महासंघाची मागणी
- वयोवृद्ध दांपत्याच्या घरावर चोरांचा डल्ला, २८ तोळे सोने लंपास


