पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कात्रज येथे महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, भारत सरकार, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रकल्प राबविले जात आहेत. एकूण रुपये 2215 कोटी किंमतीचे व 221 किमी लांबीचे 22 महामार्ग प्रकल्प यात समाविष्ट आहेत.
प्रकल्पांचे लोकार्पण केल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, अपघातग्रस्त परिसरामुळे कात्रज भागात उड्डाणपुलाचे महत्त्व आहे, त्यावर आज मार्ग निघत आहे याचा आनंद आहे. या रस्त्यावरील मोठी रहदारी बघता शक्य असल्यास दुमजली उड्डाणपूल बांधण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. एका चांगल्या संस्थेच्या माध्यमातून या रस्त्याचे अपघातप्रवण क्षेत्र म्हणून विशेष अभ्यास करून हा रस्ता चांगला करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय याशिवाय येत्या काही महिन्यात पुणे- सातारा रस्त्याचे काम मार्गी लागेल, अशीही माहिती त्यांनी दिली.
पुण्यातील विकासाचा आढावा घेताना ते म्हणाले की, देशाचे उत्तरेतून दक्षिणकडे होणारे दळणवळण पुण्यात येऊ न देता बाहेरून जाण्यासाठी सूरत-नाशिक–अहमदनगर-सोलापूर-अक्कलकोट-गुलबर्गा-यादगीर-कर्नूल-चेन्नई हा 40 हजार कोटी रुपयांचा हरित महामार्ग तयार करण्याचे योजिले आहे, यामुळे दिल्ली-चेन्नई 1600 किमी रस्ता 1270 किमी होऊन आठ तासाचा प्रवास कमी होऊन रहदारी आणि प्रदूषण कमी होईल. पुणे-सातारा मार्गावरील संपुष्टात आणलेल्या टोलचे पैसे याकरिता वापरण्यात येतील, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली.
तसेच पुणे ते बंगळुरू हा नवीन हरित महामार्ग (प्रवेश नियंत्रण) बांधला जात आहे. फलटण-सातारा-बेळगाव-बंगळुरू असा हा मार्ग जाईल. पुण्याची गर्दी कमी करण्यासाठी या रस्त्यावर नवीन पुणे विकसित करण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला गडकरी यांनी यानिमित्ताने दिला.
पालखी मार्गाचा आढावा घेताना त्यांनी माहिती दिली की, ज्ञानेश्वर पालखी मार्ग सहा पॅकेजचा, 234 किमी आणि 6710 कोटीचा असून पैकी 3 पॅकेज वर काम सुरू झाले आहे. संत तुकाराम पालखी मार्ग 136 किमीचा असून 4000 कोटी रुयापये खर्च अपेक्षित आहे. लवकरच या मार्गाला सुरुवात होत आहे.
पुणे विभागात विमानतळ, मेट्रो, नदी विकास प्रकल्प तिन्ही विषय मार्गी लागलेले आहेत. पुणे जलद गतीने वाढणारे शहर आहे, इथला विकास आंतरराष्ट्रीय दर्जाचा होणे अपेक्षित असल्याचे सांगून गडकरी यांनी पुण्यातील रिंग रोड तसेच उड्डाणपूल महाराष्ट्र शासनाने भू-संपादन जबाबदारी घेतल्यास भारत सरकार कडून बांधले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.
पुणे-तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि पुणे–शिरूर या संदर्भात मोठा प्रकल्प करण्याचा प्रयत्न करत आहे. ऊनवडी-कडेपठार-बारामती-फलटण हा 34 किमी व जवळपास 365 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे; या प्रस्तावित प्रकल्पाला मंजूरी देऊन या वर्षात काम सुरू होईल असा विश्वास त्यांनी दिला. सातारा-कागल, रत्नागिरी-कोल्हापूर (2100 कोटी खर्चाचे) मार्ग चौपदरीकरण याचाही आढावा गडकरींनी याप्रसंगी दिला. या कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, गिरीश बापट, श्रीरंग बारणे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आई-वडिलांनी स्वतःची मुलं-मुली काय करतात याकडं लक्ष द्यावं, नराधमांना असं शासन झालं पाहिजे कि…’
- ‘ज्या माणसाने एका डॉक्टर महिलेला खोट्या केस मध्ये ५२ दिवस तुरुंगात ठेवलं, त्याने…’
- रावणालाही लाज वाटेल असे मंत्री उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बसलेत – भातखळकर
- सोमय्यांनी कोल्हापुरात यावं, पण कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करु नये; मुश्रीफांची सोमय्यांना तंबी
- सोमय्यांबाबत पहिल्या दिवशी जे घडलं ते चुकीचं; खुद्द अजित पवार यांनी दिली कबुली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

