मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात सार्वजनिक वाहतूक देखील पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर, मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकलची सेवा देखील या काळात बंद करण्यात आली होती. जूनमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊन उठवल्यानंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली होती.
यानंतर, राज्य सरकारने महत्वाचं पाऊल उचलत सामान्य महिलांसाठी लोकलचा प्रवास सुरू करून नवरात्रोत्सवाची भेट दिली. मात्र, लोकलने प्रवास करण्याच्या वेळेची मुभा फारशी उपयोगी नसल्याची प्रतिक्रिया अनेक महिलांनी दिली होती. तर, सर्वांसाठी लोकलसेवा सुरु करण्यासाठी ही एक प्रकारची चाचणी असल्याचे बोललले जाऊ लागले होते.
आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाचा प्रसार, अनलॉकमधील सूट, अनेक धर्मातील येणारे सण-उत्सवाचं वातावरण, शेतकऱ्यांना मदत, मेट्रो कारशेड, मुंबईतील लोकल आदी विषयांवर भाष्य केलं.
“महिलांसाठी लोकल प्रवासाला मान्यता देण्यात आली असून, सर्वांसाठी लोकलची मान्यता देण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारबरोबर चर्चा सुरू आहे, रेल्वेमंत्री पीयूष गोयल चांगले सहकार्य करत आहेत” असं सूचक विधान ठाकरेंनी केल्यामुळे सामन्यांना बसणारा भुर्दंड लवकरच संपुष्टात येऊन लवकरात लवकर दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- अन्वय नाईक आणि ठाकरेंमध्ये आर्थिक देवाणघेवाण ? निलेश राणेंचा गंभीर आरोप
- नोटबंदी ही पंतप्रधानांनी एक जाणीवपूर्वक रचलेला कट होता – राहुल गांधी
- ‘महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी केलेलं महाराष्ट्राच्या बदनामीचं कारस्थान हे तोडून मोडून आपण उधळून लावलं’
- आघाडीत बिघाडी? राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा, तर शिवसेना देखील भगवा फडकवण्यास सज्ज!
- भाजप नेत्यांना सुशांत सारखी भावना अन्वय नाईक यांच्या बद्दल का वाटत नाही? – सचिन सावंत


