🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलेला आहे. या दाव्यावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानुसार, ही सुनावणी १० नोव्हेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे. तत्पूर्वी म्हणजेच उद्यापर्यंत मलिक यांनी या याचिकेला उत्तर द्यावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत.
मलिक यांनी प्रेस रिलीज, मुलाखती आणि समाजमाध्यमांद्वारे वानखेडे कुटुंबियांवर केलेल्या टिप्पण्या छळवणूक करणाऱ्या व बदनामीकारक असल्याचे जाहीर करावे आणि त्यापोटी १.२५ कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती ज्ञानदेव वानखेडे यांनी दाव्यात केली आहे. वानखेडे हिंदू नसून मुस्लिम आहेत, असा आरोप करून मलिक यांनी कुटुंबाच्या धार्मिक श्रद्धांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मलिक यांच्या वक्तव्यामुळे वानखेडे व त्यांच्या कुटुंबाचे नाव, प्रतिष्ठा आणि सामाजिक प्रतिमेचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे, असे दाव्यात म्हटले आहे.
ज्ञानदेव वानखेडे यांची बाजू मांडणारे वकील अर्शद शेख यांनी न्यायालयाला सांगितले की, नवाब मलिक यांच्याकडून दररोज काही खोटे आणि बदनामीकारक विधान केले जात आहेत, ज्यामुळे सोशल मीडियावर वानखेडे कुटुंबीयांबद्दल आणखी बदनामीकारक वक्तव्ये केली जात आहेत. ‘आज सकाळीच मलिक यांनी समीर वानखेडेंच्या मेहुणीबद्दल एक ट्विट पोस्ट केले आहे. तसेच किमान या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत न्यायालयाने एकतर मलिक यांना ज्ञानदेव वानखेडे यांच्या कुटुंबाबद्दल विधाने करण्यापासून रोखावे’ अशी मागणी अर्शद शेख यांनी केली.
मात्र, नवाब मलिक यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अतुल दामले यांनी आपल्याला अशा काही सूचना नसल्याने अशी हमी देण्यास नकार दिला. यावर ‘नवाब मलिक तुम्ही उद्यापर्यंत तुमचे उत्तर दाखल करा. तुम्ही ट्विटरवर उत्तर देऊ शकत असाल तर तुम्ही इथेही म्हणजे कोर्टात उत्तर देऊ शकता’ असे न्यायमूर्ती जामदार म्हणाले. दरम्यान, कोर्टाने नवाब मलिक यांना तक्रारदार ज्ञानदेव वानखेडे यांच्याविरुद्ध आणखी कोणतेही विधान करण्यापासून रोखणारा कोणताही आदेश दिलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- एसटी कर्मचाऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत न्याय मिळायलाच हवा- प्रविण दरेकर
- एका महिलेचे नाव लोकांसमोर आणून खूप चांगले काम केलेस मित्रा’, वानखेडेंचा मलिकांवर निशाणा
- मलिकांच्या ‘त्या’ आरोपांवर क्रांतीचे संतप्त प्रत्युत्तर, ‘माझी बहिण पीडित आहे आणि..’
- एसटी कर्मचाऱ्यांबाबत ठाकरे सरकारने रडीचा डाव खेळू नये-आ.विनायक मेटे
- ‘…आणि हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत’, धनंजय मुंडेवर फडणवीसांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

