मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत ईशान किशन ने चमकदार कामगिरी केली आहे. नुकत्याच आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत त्याने प्रथमच अव्वल १० मध्ये प्रवेश केला आहे. आयसीसी टी-२० क्रमवारीत त्याने ७ वे स्थान मिळवले आहे. टी-२० क्रमवारीत इशान किशन हा एकमेव भारतीय फलंदाज आहे, ज्याला या यादीत स्थान मिळाले आहे. टी-२० मधील नंबर वन फलंदाजाबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तानचा बाबर आझम ८१८ गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान ७९४ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एडन मार्कराम ७७२ गुणांसह आहे.
इशानने टी-२० क्रमवारीत ६९ गुणांनी झेप घेतली
आयसीसीने शेवटची टी-२० रँकिंग जाहीर केली तेव्हा इशान किशन ७६ व्या स्थानावर होता. परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील शानदार कामगिरीनंतर इशान किशनने ६९ गुणांनी झेप घेत ७वे स्थान गाठले आहे. तो ६८९ गुणांसह ७व्या क्रमांकावर आहे. या टी-२० क्रमवारीत तो एकमेव भारतीय फलंदाज आहे. केएल राहुल आणि रोहित शर्मासारख्या फलंदाजांना या क्रमवारीत स्थान मिळालेले नाही.
दक्षिण आफ्रिका मालिकेत इशान किशनची कामगिरी
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात इशान किशनने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. या सामन्यात त्याने ४८ चेंडूत ७६ धावा केल्या होत्या. दुसरा सामना कमी धावसंख्येचा होता ज्यात इशान किशनने २१ चेंडूत ३४ धावा केल्या होत्या. त्यानंतर विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात इशान किशनने पुन्हा एकदा ३५ चेंडूत ५४ धावा केल्या आणि विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंची घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. या दोन्ही प्रकारात पाकिस्तानच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवलेले दिसले. मात्र इशान किशन सारख्या युवा फलंदाजाने टी-२० क्रमवारीत स्वतःला सिद्ध करत सातवे स्थान पटकावले. या यादीत इशान व्यतिरिक्त इतर कोणत्याही भारतीय फलंदाजांचा समावेश करण्यात आलेला नाही.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

