आजचा (१ फेब्रुवारी) दिवस अंतराळ वैज्ञानिकांच्या दृष्टीने तसा एक काळा दिवस आहे. आजच्या दिवशी १९ वर्षांपूर्वी म्हणजे १ फेब्रुवारी २००३ रोजी कोलंबिया अंतराळयानाचा पृथ्वीवर माघारी येताना अपघात झाला. यात ७ सात अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यापैकी एक अंतराळवीर म्हणजे कल्पना चावला. आज कल्पना चावलाचा स्मृती दिन आहे. कल्पना चावला यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी त्यांचा करनाळ या गावात झाला होता. त्यांचे कुटुंब भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात विस्थापित झाले होते.
कल्पना ही बनारसी लाल चावला यांची चौथी अपत्य होती. भावंडांमध्ये त्या सर्वात लहान होत्या. लहानपणापासूनच त्यांना विमानांची खूप आवड होती आणि कल्पनाचे वडील त्यांना लहानपणी फ्लाईंग क्लबमध्ये घेऊन जात असत तेव्हापासूनच त्यांना आकाक्षात भरारी घेण्याची स्वप्न पडू लागली होती.
पण त्यांच्या वडिलांची इच्छा कल्पनाने डॉक्टर किंवा शिक्षक बनण्याची होती, असे असताना ही घरातल्यांशी भांडून त्यांनी पंजाबच्या इंजिनिरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि अंतराळ विज्ञानात डिग्री घेतली. या महाविद्यालयात त्यांना त्यांच्या शिक्षकांनी या क्षेत्रात शिक्षण घेण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण कल्पना चावलांनी त्यांचा ध्यास सोडला नाही. भारतात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेचा मार्ग धरला आणि १९८० मध्ये त्या अमेरिकेला गेल्या आणि तिथल्या नागरिक झाल्या. पुढे त्यांनी १९८८मध्ये अंतराळ विज्ञानात डॉक्टरेट पदवी घेतली. नंतर नासासाठी एम्स रिसर्च सेंटरमध्ये कामाला लागल्या. पण त्याचे भारताविषयीच प्रेम कधी संपले नाही. त्या सतत भारतात येऊन भारतातील मुलांना मार्गदर्शन करत राहिल्या. त्यांच्यामुळे ‘टागोर बाल निकेतन’ विद्यालयातील विद्यार्थ्यांना नासात शिकण्याची संधी मिळाली. कल्पनाने त्याचं प्राथमिक शिक्षण याच विद्यालयात पूर्ण केले. त्या नेहमीच भारतातील मुलींना विज्ञानात करिअर करण्याची संधी मिळावी म्हणून प्रयत्नशील राहिल्या. १९९८ पासून दर वर्षी किमान दोन मुली नासाच्या हुस्टनमधील संशोधन केंद्रात शिक्षणासाठी येत असत. कल्पना चावला त्यांची भेट घेत असत.
१ फेब्रुवारीच्या सकाळी त्यांच्या यानाने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला
१९९४ मध्ये त्यांची अंतराळवीर म्हणून निवड झाली आणि वर्षभराच्या प्रशिक्षणानंतर त्या रोबोटिक्स आणि कॉम्प्युटर ब्रांचसाठी अंतराळवीर अधिकारी झाल्या. अंतराळयानासाठी लागणारे सॉफ्टवेअर पडताळणे हे त्याचं काम होत. पण अंतराळात जायची पहिली संधी त्यांना नोव्हेंबर १९९७ मध्ये मिळाली. जेव्हा त्या कोलंबिया अंतराळयानात बसून दोन आठवडे तिथे राहिल्या. यावेळी त्यांनी अनेक प्रयोग यशस्वीरित्या पार पाडले. त्यांची पुढची अंतराळ फेरी २००० मध्ये होती पण ती लांबत गेली आणि शेवटी २००३ मध्ये १६ दिवसांच्या प्रवासासाठी त्या अंतराळ यानात बसल्या पण कधीही न परतण्यासाठी. १ फेब्रुवारीच्या सकाळी त्यांच्या यानाने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला. पण उड्डाणाच्या वेळी झालेल्या एका छोट्या अपघाताची त्यांना मोठी किंमत मोजावी लागली.
अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करते तेव्हा त्याला प्रचंड उष्णता सहन करावी लागते. त्या उष्णतेपासून संरक्षण व्हावे म्हणून यानाला एक उष्णता अवरोध आवरण लावलेले असते. कोलंबिया अंतराळयानाच्या आवरणाचा एका तुकडा उड्डाणाच्या वेळी निघून पडला होता. पण नासाने त्यावर दुर्लक्ष केले आणि वातावरणात प्रवेश केल्यानंतर काही वेळाने अतिउष्ण हवेमुळे त्यांच्या यानाचा एक पंख तुटला. पंख तुटल्यामुळे यानाचे नियंत्रण सुटले आणि ते गोल गोल फिरू लागले. एका मिनिटात त्या यानातील हवेचा दबाव निघून गेला आणि त्यामुळे सर्व अंतराळवीर मरण पावले. नंतर यांनाचे तुकडे झाले आणि ते टेक्सास आणि लुजियाना या भागात पसरले.
नासाने या घटनेची पूर्ण चौकशी केली नाही
असा अपघात होण्याची शक्यता आहे याचा पूर्ण अंदाज नासाच्या मनेजमेंटला होता पण तरी त्याची कोणतीही पूर्वकल्पना यानातील अंतराळवीरांना दिली गेली नव्हती, असा आरोप नासावर केला जातो. नासाने या घटनेची पूर्ण चौकशी केली नाही. कल्पना सोबत असलेल्या इतर सहा जणांचे केवळ तुकडे या अपघातानंतर मिळू शकले. जरी कल्पना चावला आज या जगात नसल्या तरी त्यांची यशगाथा आज ही अनेक मुलींसाठी प्रेरणादायी आहे. भारतात आजही खूप मुली त्यांच्याकडे एक प्रेरणास्थान म्हणून पाहतात.
महत्वाच्या बातम्या:
Budget 2022 : केमिकल फ्री शेतीला प्रोत्साहन देणारे-अतुल भातखळकर
२१वे ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या राफेलला मास्टर ब्लास्टर सचिनकडून अनोख्या शुभेच्छा
लग्नसमारंभासाठीच्या निर्बंधात बदल; जाणून घ्या किती जणांना असेल परवानगी
राज्यातील कोरोना रुग्णसंख्या घटल्याने निर्बंध शिथील; काय सुरु काय बंद, वाचा सविस्तर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

