औरंगाबाद : प्रशासनाने कारवाई केलेल्या दुकानांचे सील उघडून व्यापाऱ्यांना दिसायला द्यावा, अशी मागणी करीत मंगळवारी (दि.१८) खा. इम्तियाज जलील आणि आ. प्रदीप जैस्वाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे मात्र चांगलेच अस्वस्थ झाले. प्रदीप जैस्वाल एमआयएमच्या खासदारासोबत गेलेच कसे असा सवाल करीत पक्ष नेते म्हणून आपण त्यांना जाब विचारणार असा पवित्रा घेतला. मात्र थोड्याच वेळात त्यांनी नरमाईची भूमिका घेतली. हिंदू भागातील व्यापाऱ्यांनाच प्रशासनाने टारगेट केल्याचा आरोप करीत खैरे यांनी प्रशासनाला पत्रही दिले होते. या पार्श्वभूमीवर जलील-जैस्वाल यांचे एकत्रित जाणे, खैरेंना पसंत पडले नाही.
रमजान ईद अक्षय तृतीया या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचंड गर्दी झाली होती. याच काळात मनपा कामगार आयुक्त अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शहरातील विविध भागात नियमबाह्य सुरू असणाऱ्या दुकानांना सील ठोकले. मात्र या कारवाईत पक्षपात झाल्याचा आरोप करीत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जिल्हाधिकार्यांना पत्र दिले. हिंदुबहुल भागातीलच दुकानांवर कारवाया झाल्या. जुन्या शहरात मुस्लिमबहुल भागातील दुकाने खुलेआम सुरू असताना कारवाई झाली नाही, असा खैरे यांच्या पत्राचा रोखता होता. शिवसेना नेत्यांची ही भूमिका असताना काल आमदार प्रदीप जैस्वाल आणि खासदार एमआयएमचे खा. इम्तियाज जलील एकत्र जिल्हाधिकार्यांना भेटले. सील केलेली दुकाने खुली करून दुकानदारांना दिलासा देण्याची मागणी केली. आ. जैस्वाल आणि खा. जलील यांचे एकत्रित जाणे खैरेंना काही रुचले नाही. एमआयएम खासदारासोबत जैस्वाल गेलेच कसे, त्यांना जाब विचारणार असे स्पष्ट केले.
दरम्यान, आ. जैस्वाल म्हणाले, आमच्या दोघांचीही एकच भूमिका होती. मी अगोदर गेलो आणि नंतर जलील आले. व्यापाऱ्यांसाठी दोघांनीही जिल्हाधिकार्यांना साकडे घातले. लॉकडाऊनच्या काळात नियमबाह्य दुकाने सुरू असतील तर कारवाई व्हायलाच हवी. मात्र पंधरा दिवस उलटून गेल्याने आता व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आम्ही दोघांनी केली असे ते म्हणाले.
अन खैरे नरमले ! : जैस्वाल यांनी तातडीने खैरे यांच्याशी संपर्क साधत खुलासा केला. मी अगोदर गेलो होतो. जिल्हाधिकाऱ्यांची व्हीसी सुरू असल्याने तेथेच थांबलो. त्यानंतर खा. जलील आले. त्यानंतर मग दोघांनी सोबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यात व्यापाऱ्यांना दिलासा मिळावा ही दोघांचीही भूमिका असल्याने आम्ही सोबत भेट घेतली. असे स्पष्टीकरण जैस्वाल यांनी दिले त्यानंतर मात्र खैरे नरमले.
महत्वाच्या बातम्या
- सिल्लोडच्या ताफ्यात येणार चार अत्याधुनिक रुग्णवाहिका, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा पुढाकार!
- पुण्याला दिलासा ; आज नव्या कोरोना बाधितांचा आकडा हजाराच्या आत
- ‘तिसऱ्या लाटेत बालकांसाठी कोरोनापेक्षा पोस्ट कोविडच अधिक धोकादायक, पालकांनी काळजी घ्या’
- चिंताजनक ! साध्या पाण्यामुळे म्युकरमायकोसिस, आता ‘डिस्टील वॉटर’ वापरण्याच्या मनपाच्या सूचना !
- पोलीस भरतीबाबत लवकरच निर्णय जाहीर करू : गृहमंत्री वळसे-पाटील


