नागपूर : राज्यासह देशभरात कोरोनाचा हाहाकार पुन्हा एकदा वाढला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून राज्य सरकारने स्वतः ऑक्सिजन निर्मितीची वाढ करण्यासह केंद्राकडे मदत मागितली आहे. अशातच नागपुरातील ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी ‘जायसवाल निको’ कंपनीने पुढाकार घेतला आहे. याबाबत, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
नागपूरसाठी 38 मेट्रीक टन ऑक्सिजन घेऊन दोन टँकर आज सकाळी पोहोचले. त्यातून शासकीय आणि खाजगी रूग्णालये मिळून चार ठिकाणी 4180 जम्बो सिलेंडर्स भरले जातील. त्यातून सुमारे 3000 हून अधिक ऑक्सिजन बेड्सची गरज भागविली जाणार आहे. हे टँकर आज सकाळी बुटीबोरी येथे दाखल झाले. याबद्दल जायसवाल निकोचे अध्यक्ष बसंतलाल शॉ आणि सहप्रबंध संचालक रमेश जायसवाल यांचे देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत.
हे दोघेही मूळचे नागपूरकर असल्याने त्यांनी पुढाकार घेत एक दिवसाआड एक टँकर नागपूरला देण्याच्या देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीला मान दिला होता. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी आणि त्यांचे बोलणे करून दिले होते.
21 एप्रिल रोजी हा समन्वय घडवून दिल्यानंतर आज 24 एप्रिल रोजी दोन टँकर्स नागपुरात पोहोचले. सिलतारा, रायपूर येथील जायसवाल निको प्रा. लि. या इंटिग्रेडेट प्रकल्पातून हा ऑक्सिजन नागपुरात आला. हा ऑक्सिजन नागपुरात आणण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था सुद्धा निकोनेच केली. यामुळे मोठा दिलासा नागपूरला मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांचा धडाकेबाज निर्णय! रेमडेसिवीर, लस पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार
- सीबीआयच्या तब्बल दहा तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- राहुल गांधी नरमले, ‘केंद्र सरकारला सद्भभावनेने विनंती आहे की..’,
- भाजपच्या विनाशाला CBI ची टोळधाडच कारणीभूत ठरणार; मिटकरींच भाकीत
- बुडत्याला काढीचा आधार; अखेर करमाळाकरांना ३० ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध होणार


