मुंबई : मागच्या महिन्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी सुरू केली होती आणि पक्षाच्या बहुतांश आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडले. यानंतर ३० जून रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदाची शपथ दिली होती. यानंतर या सरकारने विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूकही जिंकली. त्यानंतर सरकारचा विश्वासदर्शक ठरावाही बहुमताने जिंकला. शिंदे सरकारने आता राज्यातील विविध निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान शिवसेनेचे बंडखोर नेते गुलाबराव पाटील यांनी १८ खासदारांपैकी १२ खासदार आणि २२ माजी आमदार आमच्यासोबत येणार असल्याचा मोठा दावा केला आहे.
“शिवसेना पक्षातील ५५ आमदारांपैकी तब्बल ४० आमदार सध्या आमच्यासोबत आहेत. आता पक्षातील १८ पैकी १२ खासदार आमच्याकडे येण्याच्या वाटेवर आहेत. आता पार्टी कुणाची, तर आमची. ४ खासदारांना तर मी स्वतः भेटलो आहे. आमच्यासोबत २२ माजी आमदार देखील येणार आहेत. आमचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेना आहे. आम्ही हा पक्ष उभा करू. ते वैभव परत प्राप्त करू. आम्ही ‘तमाम हिंदू बंधू, भगिणी आणि मातांनो’ हे बाळासाहेब शब्द पुन्हा महाराष्ट्रात घमवू. त्यासाठीच आम्ही बाहेर पडलो आहे.”असे यावेळी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले.
लोकं साधी सरपंचपदाची खुर्ची सोडत नाही आम्ही मंत्रीपद सोडलं
“लोकं सरपंचपदाची खुर्ची सोडत नाही. आम्ही मंत्रीपदं सोडून बाहेर निघालो. १ नाही तर ८ मंत्री बाहेर पडले. याचा अर्थ आम्हाला आमचा शिवसेना पक्ष वाचवायचा आहे. शिवसेना पक्ष संपणार अशी आम्हाला भीती वाटत होती. तो शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी आम्ही सर्वांनी हा उठाव केला आहे,”असेही पाटील म्हणाले.
संजय राऊतांना खासदार बनवण्यात आमचाही वाटा
“मला संजय राऊत यांना उत्तर देण्याची गरज नाही. ते खासदार म्हणून बसलेत त्यात आमचंही एक मत आहे. त्यामुळे त्यांनी त्या मताची किंमत ठेवावी, एवढीच त्यांना विनंती राहणार आहे.” “मला मंत्रीपद तर मिळणारच आहे, ते साहजिक आहे. मला कोणतं खातं हवं यावर बोलायचं नाही. एकनाथ शिंदे जी जबाबदारी टाकतील ती जबाबदारी मी सांभाळेल,” अस गुलाबराव पाटील यावेळी बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :


