मुंबई : दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुंबईत दाखल झाले. मुंबईत पोहोचताच त्यांनी काही खास नेत्यांची बैठक घेतली आणि थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवन गाठले. एकनाथ शिंदे गटातील बंडखोरीनंतर महाविकास आघाडी अल्पमतात आली आहे, असा दावा करत फडणवीस यांनी राज्यपालांचा हस्तक्षेप मागितला. तसेच आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावे, अशी विनंती केली.
याबाबत राज्यपाल 30 तारखेला विशेष अधिवेशन बोलावू शकतात. 30 तारखेला अधिवेशन झाले तर सकाळी 11 वाजता सुरू होईल. ठाकरे सरकारला सायंकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्यात येणार आहे. अधिवेशन सुरू झाल्यानंतर कोणताही विलंब होऊ नये आणि अधिवेशन स्थगित करू नये, असे आदेशही राज्यपाल देऊ शकतात. अधिवेशनाबाबत राज्यपालांनी अधिकृत माहिती दिली नाही. पण सोशल मिडियावर कोणाचीही सही नसलेले पत्र व्हायरल झाले आहे.
शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत 39 आमदारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा काढून घेतल्याचा दावा केला होता. त्याची प्रत राज्यपालांना देण्यात आली. यानंतर फडणवीस यांनी राज्यपालांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्याची विनंती केली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह चंद्रकांत पाटील राजभवनात उपस्थित होते.
राज्यपालांना भेटल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज माननीय राज्यपालांना ईमेल आणि थेट पत्र देऊन भाजपने मुख्यमंत्री आणि सरकारकडे बहुमत नसल्याचे सांगितले. राज्यातील परिस्थिती पाहता शिवसेनेचे 39 आमदार पक्षाबाहेर असून ते महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देत नसल्याचे सातत्याने सांगत आहेत. म्हणूनच आम्ही माननीय राज्यपालांना तत्काळ मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश देण्यास सांगितले.”
यापूर्वी, देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत जाऊन भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. ही बैठक सुमारे अर्धा तास चालली. फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी न बोलता विमानतळावरून थेट मुंबईला रवाना झाले. मुंबईत येताच भाजप नेते त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या सागर बंगल्यातील घरी पोहोचले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनात पोहोचले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

