मुंबई: गोव्याचे तत्कालिन राज्यपाल आणि सध्याचे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काल गोवा मधील प्रमोद सावंत सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच कोरोना काळात काळात गोवा भाजप सरकारने मोठा भ्रष्टाचार केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान याचपार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाजपवर निशाना साधत टीका केली आहे. भाजपच्या विद्यमान राजवटीत गोव्यासारखे निसर्गरम्य राज्य भ्रष्ट आणि गलथान कारभाराच्या दलदलीत फसले आहे. गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘सत्य’ कथन करुन ही ‘झाकली मूठ’च आता उघड केली, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
देशातील कोरोना विषाणूचा धुमाकूळ बराच कमी झाला असला तरी आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा मात्र खाली बसायला तयार नाही. मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही आता दोन गंभीर आरोप केले आहेत. त्यातील एक आरोप ते जम्मू-कश्मीरचे राज्यपाल होते त्या काळातील आहे. दुसरा आरोप गोव्याच्या भाजप सरकारविरोधात आहे. जम्मू-कश्मीरचे राज्यपाल असताना दोन ‘महत्त्वा’च्या फायलींवर स्वाक्षरी करण्यासाठी आपल्याला 300 कोटींची लाच देऊ केली गेली होती. मात्र आपण ते दोन्ही व्यवहार रद्द केले, असा दावा मलिक यांनी राजस्थानमधील एका मेळाव्यात बोलताना केला आहे.
मलिक यांनी हा ‘गौप्यस्फोट’ दोन वर्षांनंतर का केला, हा प्रश्न विचारला जात आहे. मात्र मलिक हे सडेतोड बोलण्यासाठी ओळखले जातात, हेदेखील लक्षात घ्यायला हवे. आता जम्मू-कश्मीरच्या कार्यकाळातील गौप्यस्फोटाचे काय होणार, हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील मुद्दा आहे. खरा प्रश्न आहे तो सत्यपाल मलिक यांनी गोव्यातील भाजप सरकारबाबत केलेल्या गंभीर आरोपांचा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
कायदा आणि सुव्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह गडद करणाऱ्या घटना गोव्यात सातत्याने घडत आहेत. तरुण पिढी अमली पदार्थ, जुगाराच्या अधीन होत चालली आहे. गोव्याची परिस्थिती अशी गंभीर व बकाल झाली आहे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत गोव्यातील प्रत्येक गाव स्वयंपूर्ण करणार, अशी थापेबाजी करीत आहेत. ‘सरकार तुमच्या दारी’ नावाचा एक पडेल प्रयोगही त्यांनी मध्यंतरी करून पाहिला. त्यामुळे गोव्याचे वास्तव झाकले जाईल, असे त्यांना वाटले असावे. वास्तविक भाजपच्या विद्यमान राजवटीत गोव्यासारखे निसर्गरम्य राज्य भ्रष्ट आणि गलथान कारभाराच्या दलदलीत फसले आहे. असे मत संजय राऊत यांनी सामनातून व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वानखेडेंवर कारवाई करण्याबाबत नवाब मलिकांचं सूचक वक्तव्य
- तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला; वानखेडे प्रकरणी चित्रा वाघ आक्रमक
- देवस्थान जमीन घोटाळ्यातील आरोपी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघावचा अटकपूर्व जामीन फेटाळला
- फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्याविरोधात सबळ पुरावे; राज्य सरकारची कोर्टासमोर माहिती
- ‘मोठे लोकही फाटलेले कपडे घालतात का..’म्हणणाऱ्या नेटकऱ्यांकडून जॅकलिन झाली ट्रोल


