अहमदनगर : आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या सातव्या दिवशी राज्यसभेत कृषि विधेयके मांडण्यात आली. संसदेच्या वरिष्ठ सदनात विधेयकावर चर्चेनंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी उत्तर दिलं. तोमर हे उत्तर देत असताना विरोधकांनी मात्र राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला. या गोंधळातच कृषि विषयक विधेयके राज्यसभेतही मंजूर झाले आहेत. आवाजी मतदानाने हे विधेयके राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे.
यानंतर या विधेयकावर संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं आहे, तर विरोधकांनी नंतर प्रचंड गदारोळ करत हे विधेयक शेतकऱ्यांसाठी जीवघेणं ठरेल असा आवाज उठवत विरोध केला. आता शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून या कायद्यांविरोधात देशभरातील २०८ शेतकरी संघटना २५ सप्टेंबरला देशव्यापी आंदोलन करणार आहेत.
किसान संघर्ष समितीचे नेते अजित नवले म्हणाले, ” बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांना हमीभाव नाकारणारं, बाजार समित्या उद्ध्वस्त करणारं, सरकारची जबाबदारी कमी करणारं आणि शेतीसह शेतकऱ्याला कॉर्पोरेट घराणे, कंपन्या, दलाल आणि प्रक्रियादारांच्या दावणीला बांधणारी 3 विधेयकं केंद्र सरकारने मंजूर केले. त्यांचं आज कायद्यात रुपांतर झालं असं असलं तरी या कायद्यांना संबंध देशभरात प्रचंड विरोध होत आहे.”
यासोबतच, “किसान समन्वय संघर्ष समितीत सामील असलेल्या 208 संघटना याविरोधात संबंध देशभरात लढत आहेत. 25 सप्टेंबर रोजी या कायद्यांविरोधात देशभरात कृती करत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. संघर्ष समितीने या कायद्यांविरोधात देशभरात तीव्र आंदोलन करण्याची हाक दिली आहे. आज बहुमताच्या जोरावर केंद्र सरकारचा विजय आणि शेतकऱ्यांचा पराजय झाला असला, तरी 25 सप्टेंबरच्या आंदोलनानंतर सरकारला माघार घ्यावी लागेल. सरकारला शेतकऱ्याचं म्हणणं ऐकावं लागेल आणि त्यासाठी पूर्ण शक्तीने काम केलं जाईल,” असं देखील अजित नवलेंनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- पावसामुळे नुकसान झाल्याने ३० एकर भुईमुगाला लावली काडी
- खासदार सुनील मेंढे यांनी संसदेत मांडला भंडाऱ्याच्या पूरस्थितीचा लेखाजोखा
- संभाजीराजेंच्या इशाऱ्यानंतर देखील कोल्हापुरात मराठा आंदोलकांना नोटिस!
- नगर-मनमाड महामार्ग दुरावस्थेच्या निषेधार्थ तरुणांनी केले मुंडण आंदोलन
- ‘विरोधकांनी किसानद्रोही असल्याचं सिद्ध केलंय’ ; भाजपच्या अवधूत वाघांचा टोला


