मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप नेते प्रविण दरेकर यांच्यात चांगलाच सामना रंगला आहे. रोहित पवार यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला होता. २०१४ चे खरे मुख्यमंत्री भाजप नेते गोपीनाथ मुंडे होते. जर आज गोपीनाथ मुंडे असते तर राजकारणाची पातळी इतकी घसरली नसती, असे रोहित पवार म्हणाले होते. याला प्रविण दरेकर यांनी जोरदार उत्तर देत रोहित पवारांवर निशाणा साधला होता.
गोपीनाथ मुंडे जर आज हयात असते तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते, असे बोलण्याऐवजी रोहित पवारांनी स्वतःच्या घरातील परिस्थिती पाहावी, असा टोला प्रविण दरेकर यांनी रोहित पवारांना टोला लगावला होता. रोहित पवारांनी आधी त्यांच्या घरातील अजित पवार, सुप्रिया सुळे की ते स्वतः मुख्यमंत्री होणार, यावर एकमत करा आणि मग हयात नसलेल्यांशिषयी बोलावे, असेही दरेकर म्हणाले होते. याला रोहित पवारांनी देखील उत्तर दिले आहे.
रोहित पवार म्हणाले, काही राजकीय नेत्यांचं कर्तृत्व राजकारणाच्या पलिकडं असतं तसंच कर्तृत्व स्व. मुंडे साहेबांचं असल्याने ते लोकनेते होते. त्यांनी अनेक कार्यकर्ते आणि नेते घडवले. म्हणून सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ते त्यांच्याकडं मुख्यमंत्री म्हणूनच बघायचे. त्यामुळं मुंडे साहेबांविषयी मी व्यक्त केलेल्या भावनांचं दरेकर साहेब आपण स्वागत करायला हवं होतं. परंतु तसं न करता उलट आपण माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यावरच टीका केली हे आश्चर्यकारक आहे. कदाचित मुंडे साहेबांच्या निधनानंतर आपण भाजपमध्ये आल्याने आपणास मुंडे साहेब समजले नसावेत.”
“आणि हो… पवार कुटुंब म्हणून आम्ही एकत्रितपणे राजकीय दिशा ठरवत असतो आणि आमचं ठरलंय. त्यामुळं दरेकर साहेब आपण पवार कुटुंबाची चिंता करू नये! उलट राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल हे आपण मान्य केलं, याबद्दल आपले आभार..!”, असा खोचक टोला देखील रोहित पवारांनी दरेकरांना लगावला.
महत्वाच्या बातम्या :


