🕒 1 min read
औरंगाबाद : अडिच महिने बंद असलेली एसटी बससेवा १ जूनपासून सुरु करण्यात आली आहे. गुरुवारी औरंगाबाद विभागातून पुणे, धुळे, नाशिक, जळगाव, जालना आदी मार्गांवर सुमारे सव्वीस बसेस धावल्याची माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांकडून मिळाली. आधीचे लॉकडाऊन आणि आत्ताचे कडक निर्बंध यामुळे एसटीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आता हळूहळू प्रवासी संख्या वाढून झालेले नुकसान काही प्रमाणात भरुन निघण्याची अपेक्षा विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना व्यक्त केली.
एसटी महामंडळाची बस सेवा अत्यावश्यक सेवेत असली तरी कोरोनामुळे घराबाहेर पडणे व प्रवास करणे टाळले जात होते. त्यामुळे एसटीला प्रवासी सेवा बंद करावी लागली. तब्बल अडीच महिन्यांच्या विश्रांतीनंतर एक जून पासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी कामानिमित्त विविध ठिकाणी जाण्यासाठी आता एसटी बसकडे वळले आहे. त्यामुळे एक जून पासून एसटीने पुणे धुळे, जळगाव, नाशिक, जालना आदी मार्गांवर प्रवासी सेवा सुरु केली आहे.
पहिल्या दिवशी केवळ १४ ते १५ गाड्या विविध मार्गांवर धावल्या. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी थोडा प्रतिसाद वाढल्याने २६ गाड्या सोडण्यात आल्या. हळूहळू प्रवासी संख्येत वाढ होण्याची शक्यता असून प्रवासी संख्या वाढ झाल्यास विविध मार्गांवर आणखी बससेवा देण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली. गतवर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या आर्थिक फेऱ्यामधून एसटी बाहेर पडत नाही तोच पुन्हा एकदा कडक निर्बंधांच्या आर्थिक चिखलात एसटीचे चाक अडकले आहे. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे एसटी प्रशासनावर मोठा परिणाम झाला होता. हजारो कोटींचा भुर्दंड एसटीला सहन करावा लागला होता. आत्ताच्या कडक निर्बंधांमध्येही औरंगाबाद एसटी विभागाचे २२ कोटींचे नुकसान झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काँग्रेसचे मंत्री लाचार झालेत, ते काका-पुतण्यांसमोर माना डोलावतात’
- ‘काँग्रेसनेच अण्णासाहेब पाटील यांची हत्या केली’, आ.मेटेंचा खळबळजनक आरोप
- आरक्षणावरून संभाजीराजेंनंतर भाजपचे आणखी एक खासदार आक्रमक
- ‘उद्या बीडमध्ये निघणारा मोर्चा मराठा समाजाचा नव्हे तर..’, काँग्रेसचे वादग्रस्त वक्तव्य
- मराठा आरक्षणाच्या मोर्चावरून आ.मेटे आणि बीड प्रशासन आमनेसामने


