नागपूर – कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना आजची स्थिती आणि भविष्यात स्थिती आणखी बिकट झाल्यास करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून एक बैठक आज आयोजित करण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री, दोन्ही विभागांचे आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
दुसऱ्या लाटेचे परिणाम गंभीर असताना आणखी संकट गडद झाल्यास गडचिरोलीसह विदर्भातील दुर्गम भागात तसेच सर्वच जिल्ह्यांत सुद्धा आरोग्य यंत्रणा सक्षम असली पाहिजे. भविष्यातील ऑक्सिजनची गरज भागली पाहिजे आणि त्यासाठी पीएसए ऑक्सिजन प्रकल्पांचे तातडीने कार्यान्वयन केले पाहिजे, हा या बैठकीचा मुख्य विषय होता.
संकट वाढले तर अतिरिक्त मागणी लक्षात घेऊन विदर्भात लागणारा एकूण ऑक्सिजन, त्यादृष्टीने पीएसए प्लांटचे रूग्णालयनिहाय कार्यान्वयन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मागणी आणि त्याचे नियोजन तसेच रेमडेसिवीरची मागणी आणि पुरवठा इत्यादींबाबत या बैठकीत अतिशय सखोल चर्चा झाली.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पीएसए प्लांटची मागणी तत्काळ नोंदविली पाहिजे. यासाठीची प्रक्रिया कोणत्याही प्रकारच्या शासकीय नियमात अडकू नये, असे नियोजन तत्काळ करण्यात यावे, तसेच काही सिलेंडर्स ऑक्सिजनच्या वापरासाठी कन्व्हर्ट करण्याचे काम आपातकालिन स्थितीत तातडीने केले पाहिजे.
या बैठकीला मंत्री एकनाथ शिंदे, डॉ. विश्वजित कदम, शंभुराजे देसाई, यशोमती ठाकूर, नवाब मलिक, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, बच्चू कडू यांच्यासह विदर्भातील बहुतेक पालकमंत्री, अमरावती, नागपूर विभागांचे आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाबाधित मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी मनपातर्फे आता नि:शुल्क लाकुड पुरवठा
- परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती टळली
- ‘एकाच रुग्णवाहिकेत २२ मृतदेह कोंबण्याची घटना मानवतेला कलंकित करणारी’
- ‘राज्यातील सरकार हे तीन पक्षांचे आणि भिन्न विचारांचे असल्याने त्यांच्यात ताळमेळ नाही’
- कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नावनोंदणी कशी कराल ? जाणून घ्या सोपी प्रक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
