टीम महाराष्ट्र देशा : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी नुकताच पार पडला. विधिमंडळ परिसरात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकूण ३६ आमदारांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यात अजित पवार यांनी उपमुख्य मंत्रीपदाची शपथ घेतली. याप्रसंगी धनंजय मुंडे यांनी कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ घेतली.
वाचा, कोण कोण आहेत धनंजय मुंडे
बीडच्या परळी विधानसभा मतदार संघासाठी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची यंदाची लढत अत्यंत चुरशीची आणि संघर्षमय होती. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या लढतीकडे लागले होते. एकमेकांसाठी पंकुताई आणि धनुभाऊ असलेले हे भाऊ-बहीण राजकारणाच्या आखाड्यात परस्परांचे कट्टर विरोधक आहेत. गोपीनाथ मुंडे हयात असतानाच दोघांमधील संघर्षाची ठिणगी पडली होती.
गोपीनाथ मुंडे जेव्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले, तेव्हा बीडमधला त्यांचा वारसदार म्हणून त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांच्याकडे अनेक जण पाहत होते. मुंडे महाराष्ट्र पातळीवर राजकारण करत होते तर धनंजय मुंडे यांच्याकडे परळी आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणाची धुरा होती. 2009 मध्ये गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. धनंजय मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. पण इथूनच सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती.
दरम्यान, अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या परळी मतदारसंघात बहिण-भावाच्या लढतीत भावाचा विजय झाला. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी भाजपच्या पंकजा मुंडेंचा 30 हजारापेक्षा जास्तीच्या फरकाने पराभव करत बाजी मारली. मुंडे बहिण-भावात चुरशीची लढत होती. अखेर या लढतीत धनंजय मुंडेची सरशी झाली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी 121, 186 इतक्या बहुमतांनी विजय झाला.


