पुणे : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कोरोनाने पुन्हा एकदा कहर घातला आहे. मागील वेळेपेक्षा ही लाट अधिक गंभीर असल्याने रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणे गरजेचं आहे.
अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण होत असून आता सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोव्हीशील्ड’ या लसीच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे सामान्यांना लस घेण्यात आर्थिक अडचण निर्माण होण्याची भीती असताना राज्य सरकार नागरिकांना कोरोना लस मोफत देण्याची शक्यता आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.
१ मे पासून १८ ते ४४ वयोगटातल्या सर्वांना लसीकरण करून घेता येणार आहे. राज्यात मोफत लस उपलब्ध करून देंण्याबाबत हालचाली सुरु आहेत. तसे झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल व लसीकरणाला देखील चालना मिळेल. याबाबत, अजित पवार म्हणाले, ‘मोफत लसीसंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री १ मे रोजी भूमिका जाहीर करणार आहेत. त्याबद्दल तेव्हाच सांगितलं जाईल. पूनावाला म्हणाले आत्ता मी तुम्हाला इतकी लस देऊ शकणार नाही. त्यांनी सांगितलं की माझ्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला लस देईन. उरलेली लस तुम्ही इतर कंपन्यांकडून घ्या. सध्या ते इंग्लंडला गेले आहेत. ते परत आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोलू.’
यासोबतच,ज्या प्रमाणे केंद्राने गॅस सबसिडीबाबत नागरिकांना आवाहन केलं होतं त्याच प्रमाणे ज्यांना लस विकत घेणे शक्य आहे, त्यांनी पैसे देऊन लस घ्यावी. तर, गरिबांना मोफत लस मिळावी यासाठी प्राधान्य देता येईल का ? याची चाचपणी सुरु असल्याचं देखील अजित पवार म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- अजित पवारांचा धडाकेबाज निर्णय! रेमडेसिवीर, लस पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार
- शहरात तुटवडा, मनपाने मागवले १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन!
- पीपीई कीट घालत कोव्हीड हॉस्पिटलची पाहणी करणाऱ्या खासदार मुंडे यांना कोरोनाची लक्षणे
- भाजपच्या विनाशाला CBI ची टोळधाडच कारणीभूत ठरणार; मिटकरींच भाकीत
- जळकोटमध्ये डेडिकेटेड कोविड रुग्णालयाची नुसतीच घोषणा !


