मुंबई : शिवसेनेनं भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीला येत्या निवडणुकांमध्ये शह देण्यासाठी आता भाजप आणि मनसे हे दोन पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. अशातच आज सकाळीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची मुंबईत ‘कृष्णकुंज’वर भेट झाली. यामुळे येत्या काळात भाजप-मनसेची जवळीक वाढून युती होण्याची शक्यता वाढली आहे.
दरम्यान, या भेटीबाबत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मनसे-भाजप युतीबाबत पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केला असता, ‘मनसेची परप्रांतीयांचा मुद्द्याबाबत भूमिका स्पष्ट होत नाही, तो पर्यंत काही सांगता येत नाही,’ अशी भूमिका स्पष्ट केली आहे.
‘मला असं वाटतं चंद्रकांत दादांनी भेटीनंतर स्पष्ट केलं आहे. नाशिकला भेट झाली तेव्हा राज ठाकरेंनी त्यांना निमंत्रण दिलं होतं. त्यांनी त्यांना सीडीदेखील पाठवली होती. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे. युती वगैरे या विषयावर कोणतीच चर्चा झालेली नाही, असं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. महाराष्ट्रात तरी कुणी कुणाला भेटण्यावर तरी बंधनं नाहीत,’ असं फडणवीस म्हणाले.
तर, ‘राज ठाकरे आणि आमच्या पक्षामध्ये फरक इतकाच आहे की, परप्रांतीयांच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाहीत. त्यांनी आता हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. आमची भूमिका देखील हिंदुत्वाची आहे, हा आमच्यातील समान धागा निश्चितपणे आहे. त्यामुळे दुसऱ्या मुद्द्यांचं जिथपर्यंत निराकारण होत नाही, तोपर्यंत जर तरच्या गोष्टी करण्यात अर्थ नाही,’ असं देखील फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- संजय राऊतांनी एकदा निवडणूक लढवून दाखवावीच; मनसेचं खुलं आव्हान !
- सीरम इनस्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला पोहचले गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला
- ‘आता मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करा’, खा.गौतमची ‘गंभीर’ मागणी
- राज ठाकरेंचे पुण्याकडे खास लक्ष; चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर
- हे तर रोगट व द्वेषपूर्ण मानसिकतेचे लक्षण; भातखळकरांची टीका


