औरंगाबाद : भाजपला धक्का देत शिवसेनेने ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीच्या सरकारची स्थापना केली. यानंतर, या विसंगत विचारधारा असलेल्या पक्षाचे सरकार फार काळ टिकणार नाही अशी टीका भाजप नेत्यांनी केली.
आता, या सरकारला वर्षपूर्ती होत आली असून अनेक संकटांना सामोरं जावं लागलं आहे. काँग्रेस नेत्यांची नाराजी, शिवसेनेतील स्थानिक नेत्यांची बंडखोरी, राष्ट्रवादीच्या मुत्सद्देगिरीचा आरोप देखील या काळात करण्यात आला. त्यामुळे आघाडीत बिघाडी असल्याचं वारंवार समोर आलं पण राज्य पातळीवरील नेत्यांनी सरकारला स्थिर ठेवले.
तर, हे सरकार स्वतःच्याच कर्माने पडणार अशी टीका भाजप नेत्यांनी वेळोवेळी केल्याचं दिसून आलं. भाजपच्या या टीकेला राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपच्या आमदारांनी पक्ष सोडू नये म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ‘हे सरकार पडणार’, असे सतत सांगत राहावे लागते, असा टोला त्यांनी लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांना आपली माणसं टिकवण्यासाठी सरकार पडणार, असं बोलावं लागतं. आणखी काही काळ ते असंच बोलत राहतील. त्यानंतर फडणवीस यांचं बोलणं आपोआप बंद होईल, असा चिमटा देखील जयंत पाटलांनी काढला आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जयंत पाटील गुरुवारी औरंगाबादमध्ये आले होते. यानंतर त्यांनी सतीश चव्हाण यांच्या प्रचार कार्यालयाचेही उद्घाटन केले. या कार्यक्रमाला आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
महत्वाच्या बातम्या
- सर्वोच्च न्यायालयाने अशीच तत्परता मराठा आरक्षणप्रश्नी दाखवावी – सचिन सावंत
- जेलमधून बाहेर पडताच अर्नबची दुसऱ्या जामिनासाठी पळापळ !
- ‘देशात पहिल्यांदा मंदी आली, मोदींनी देशाची शक्ती कमकुवत केली’
- मल्टिप्लेक्स सिनेमा संदर्भातील अडीअडचणी सोडविण्याबाबत प्रयत्न करणार – जयंत पाटील
- ‘मी नाराज असल्याच्या चर्चा व्यर्थ, पण…’


