🕒 1 min read
अहमदनगर : केंद्रातील भाजप सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ माजली होती. दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढणार असं चित्र निर्माण झालं होतं.
अण्णांनी या वयात उपोषण करू नये यासाठी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरु होत्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुमारे आठवड्याभरापासून प्रयत्न सुरु केले होते. आधीच्या काही मागण्या केंद्र सरकारने आश्वासन देऊन देखील पूर्ण केल्या नव्हत्या, यामुळे नाराज होऊन अण्णा हजारे यांनी त्या मागण्या व कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी ३० जानेवारी म्हणजेच महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनापासून उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली होती.
मात्र, केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, देवेंद्र फडणवीस व भाजपच्या इतर नेत्यांनी राळेगणसिद्धीमध्ये जाऊन आज पुन्हा एकदा अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी, केंद्र सरकारतर्फे अण्णांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करुन त्यामाध्यमातून येत्या सहा महिन्यात प्रस्ताव पाठवला जाईल, अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विनंतीचा मान ठेवून अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतल्याचं घोषित केलं आहे. कैलास चौधरी, देवेंद्र फडणवीस व अण्णा हजारे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन उपोषण मागे घेतल्याची माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठा मोर्चामधील आंदोलकांचे गुन्हे मागे घेणार-गृहमंत्री अनिल देशमुख
- शेतकऱ्यांनी मागे हटू नये, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत – राहुल गांधी
- ‘शॅडो’ चे पण ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी’; ‘त्या’ ठाकरेंच्या उपस्थितीवर वरुण सरदेसाईंनी डागली तोफ
- भाजपाशीच संबंधित एका गटाने दिल्लीत गोंधळ घडवला; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
- ‘रामायण काल्पनिक असल्याचा दावा करणाऱ्या पक्षाच्या लोकांना हिशोब मागण्याचा हक्क नाही’


