🕒 1 min read
मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ठाण्यातील तरुणाला झालेल्या मारहाणप्रकरणाच्या तपासात पोलिसांकडून निष्पक्ष तपासाची अपेक्षा आहे. मात्र, अनेक महत्वाच्या मुद्द्यांकडे पोलिसांकडून सरळसरळ दुर्लक्ष करीत कच्चे दुवे ठेवले जात आहेत. त्यामुळे सामान्य तरुणाला न्याय कसा मिळेल, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पत्रकान्वये व्यक्त केली आहे. जितेंद्र आव्हाडांवर मेहेरनजर ठेवण्यासाठी फिर्यादी तरुण अनंत करमुसे यांनाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे का, असा सवालही दरेकर यांनी विचारला आहे.
ठाण्यातील तरुण अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाणीच्या तपासात ठाणे पोलिसांनी ठेवलेले कच्चे दुवे, दिरंगाई आणि आव्हाडांवर कृपाछत्र ठेवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांवर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी थेट शरसंधान केले आहे. सतत दोन वेळा पोलिस ठाण्यात जाऊनही फिर्यादी अनंत करमुसे यांचे पुरवणी स्टेटमेंट का घेतले नाही. त्यातून मंत्री जितेंद्र आव्हाडांवर मेहरेनजर करण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता का, करमुसेंच्या निवासी सोसायटीतील सीसीटीव्ही चित्रीकरणात करमुसेंना ३-४ पोलिस सुरक्षारक्षक नेत असल्याचे स्पष्ट होत असतानाही, सुरक्षारक्षकांवर कारवाई का झालेली नाही, असा सवाल दरेकर यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार क्रॉस कंप्लेट असलेल्या प्रकरणात एकाच तपास अधिकाऱ्याकडून चौकशी केली जाते. मात्र, या प्रकरणात दोन चौकशी अधिकारी आहेत. तरी एकाच अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केली. त्याचबरोबर तपास वेगाने होऊन पळवाटा राहणार नाहीत, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
अनंत करमुसे यांच्या फिर्यादीत, जितेंद्र आव्हाडांच्या समोर १५ ते २० जणांनी मारहाण केल्याचा आरोप होता. मात्र, या प्रकरणी आरोपी म्हणून आव्हाडांचा समावेश करण्यात आला नाही. त्यांना अटकही झालेली नाही. तर १५ ते २० आरोपींऐवजी केवळ ५ जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली. हा दुजाभाव का केला जात आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या मोबाईलचे लोकेशन व कॉल डिटेल रिपोर्ट (सीडीआर), आव्हाडांचे निवासस्थान व परिसरातील सीसीटीव्ही चित्रण, गुन्ह्यात वापरलेली गाडी, मारहाणीसाठी वापरलेली शस्त्रे आदी पोलिसांनी अद्यापि ताब्यात घेतलेले नाही. त्यावरुन जितेंद्र आव्हाडांवर पोलिसांकडून मेहेरनजर ठेवली जात असल्याचे सिद्ध होत आहे, असे मुद्दे प्रविण दरेकर यांनी पत्रकात नमूद केले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
