मुंबई – डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या काळात २७.१ कोटी लोकांना गरिबी रेषेच्यावर आणले होते मात्र मागील वर्षी २३ कोटी लोक गरिब रेषेच्या खाली ढकलेले गेले आहेत. युपीए सरकारने १० वर्षात कमावलेले सर्व काही अवघ्या एका वर्षात मोदी सरकारने घालवले. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ९७ टक्के कुटुंबाचे उत्पन्न घटले आहे अशी टीका कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर हल्ला चढवला. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, प्रमोद मोरे आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, पीएचे सरकार असताना मनरेगा, शिक्षण हक्क कायदा, अन्न सुरक्षा कायदा याच्या माध्यमातून सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला होता. पण मोदी सरकारने सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडले आहे, महागाईचा बोजा टाकून कार्पोरेट टॅक्समध्ये मात्र वारंवार सवलत दिली जात आहे. मोदी सरकार ‘हम दो हमारे दो’ चे सरकार आहे.
खर्गे म्हणाले, मोदी सरकारने कोरोनाचे संकट व्यवस्थित हाताळले नाही. डॉ. मनमोहनसिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी पत्र पाठवून कोरोना संकटात उपाययोजना करण्याचा सल्ला दिला होता पण त्याकडे दुर्लक्ष केले. कोरोनामुळे २ लाख ७५ हजार मृत्यू झाल्याचे आकडे आहेत हा आकडा मोठा असू शकतो. कोरोनाने लोकांच्या नोकऱ्याही गेल्या, मागील एका वर्षात १.३३ लाख नोकऱ्या गेल्या. दरडोई उत्पन्न १० हजार रुपयांनी घटले, जीडीपी ९-१० टक्क्यांनी घसरला. देश रसातळाला गेला पण त्याची जबाबदारी मोदी सरकार घेत नसून इंधन दरवाढीला युपीए सरकारच जबाबदार असल्याचा उलटा आरोप करत आहे. परंतु कररुपाने लाखो कोटी रुपये कमावूनही राज्याच्या हक्कांचा जीएसटी परतावाही मोदी सरकार देत नाही. महाराष्ट्राचा ३२ हजार कोटी रुपयांचा जीएसटी परतावा अजून दिला नाही.
डिझेलचे दर वाढल्याने शेतकऱ्यांवर त्याचा थेट परिणाम होतो. शेतीच्या साहित्यावरही जीएसटी आकारला जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारने शेतकऱ्यालाच रस्त्यावर आणले आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर असलेले तीन कृषी कायदे रद्द कारावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर ७ महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत पण मोदी सरकार कृषी कायदे रद्द करण्यास तयार नाही. विश्व गुरु होण्यास निघालेल्या मोदींनी आधी देशाचे गुरु व्हावे नंतर विश्वगुरुचे पाहु, असेही खर्गे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- वेब सिरीजनंतर क्रीडाविश्वात ‘समांतर’ची पुनरावृत्ती! सचिन-मेसीची सारखीच कहाणी
- ‘शाळा अद्याप सुरू करू नयेत, कारण…’ ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भूमिका
- महाराष्ट्रात आज कोरोनाचे ८ हजार ५३५ नवे रुग्ण तर ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त
- ‘नागरिकांनी ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नये’, मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
- लोकसंख्येचा विस्फोट होत असेल तर कायदा गरजेचाच – देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

