औरंगाबाद : गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबाद शहरात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. बुधवारी मनपाकडे केवळ ३०० लसींचा साठा शिल्लक होता. त्यामुळे प्रोझोन मॉलच्या पार्किंग मध्ये ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सुरू होते. मात्र या ठिकाणी पायी येणाऱ्यांनाही लस दिली जात असल्याने नागरिकांनी या ठिकाणी एकच गर्दी केली. केवळ तीनशे लसी असल्याने नागरिकांना अनेक तासांसाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. त्यातच पुरुष आणि महिला यांच्यासाठी एकच रांग असल्याने गोंधळ उडाला.
प्रोझोन येथे सकाळपासून नागरिकांनी तोबा गर्दी केली. कुपन मिळविण्यासाठी अक्षरशः रेटारेटी झाली. महापालिकेने शहरातील ११५ वॉर्डात लसीकरण केंद्र सुरू केले होते. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ७० ते ८० केंद्रावर लसीकरण केले जात होते. पण रविवारनंतर (दि. २७) महापालिकेला लसींचा साठा मिळालेला नाही.
मंगळवारी (दि.२९) लसीकरणानंतर महापालिकेकडे केवळ ३५० लसी शिल्लक होत्या. त्यामुळे प्रोझोन मॉल येथील पार्किंगमध्ये ड्राइव्ह इन आणि पायी आलेल्या नागरिकांसाठी असे दोन स्टॉल लावण्यात आले होते. लसीकरणाची वेळ सकाळी १० ची असल्याने नागरिकांनी गर्दी केली. तसेच दुसऱ्या बाजूला कारच्याही रांगा लागल्या होत्या. प्रत्यक्षात दुपारी एक वाजता लसीकरणाला सुरुवात झाली. तोपर्यंत प्रचंड गोंधळ रेटारेटी सुरू होती.
तब्बल तीन तास लसीकरण सुरू होणार किंवा नाही अशी द्विधा अवस्था निर्माण झाली होती. अखेर एक वाजेच्या सुमारास व्हॅक्सिन घेऊन वाहन आल्यानंतर लसीकरणाला सुरुवात झाली. त्यातच ड्राईव्ह इनच्या माध्यमातून लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना प्रोझोन कर्मचाऱ्यांच्या घुसखोरीमुळे तासन तास रांगेत उभे राहावे लागले. कार ची रांग रत्नप्रभा मोटर्स ही पुढे गेलेली होती. कर्मचाऱ्यांची घुसखोरी कारमधून आलेल्या नागरिकांच्या लसीकरणात बाधा ठरत होती. कारची रांग अत्यंत धीम्या गतीने पुढे सरकत होती. दुसरीकडे पायी आलेल्या नागरिकांना दीडशे कुपन वाटप करण्यात आले. ज्यांना कुपन मिळाले नाही, त्यांना घरी जावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणेकरांच्या चिंतेत वाढ; आज नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ !
- टिसी देण्यास, ऑनलाईन शिक्षणास शाळांचा नकार, तक्रात निवारण समितीसमोर पालकांनी मांडल्या व्यथा!
- ‘अजित पवार तुम्हाला कोणीच वाचवू शकत नाही; २०२४ च्या पराभवाआधीच तुम्ही जेलमध्ये असाल’
- राजस्थान भाजपमधील अंतर्गत वादाचा कॉंग्रेसला होतोय चांगलाच फायदा
- पुणे झालं अजून मोठं; शहराच्या हद्दीत तब्बल २३ गावांचा झाला समावेश


