मुंबई : श्रीलंका सारखी परिस्थिती होण्याआधी जनतेने धर्मांध राजकारणाला बाजूला सारावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडून जनतेला आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक फेसबुक पोस्ट चर्चेत आहे. या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जनतेला महागाईच्या मुद्द्यावरून आवाहन केले आहे. ‘महागाईचा भोंगा जोरात वाजतोय,’ असे शीर्षक या पोस्टला आहे.
एकीकडे देशात महागाई हा मुद्दा असताना, देशात सध्या सुरु असलेले भोंग्यांचे वातावरण, कर्नाटकमधील हिजाब प्रकरण, जेएनयूमध्ये श्रीराम नवमीला घडलेले हिंसक कृत्य, महाराष्ट्रात मशिदीवरील भोंग्यांचा विषय, हिंदूंनी अधिक मुलं जन्माला घालावीत इत्यादी धार्मिक मुद्दे आणून समाजा-समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे, असे या पोस्ट मध्ये म्हंटले आहे.
मार्च २०२२ महिन्यामध्ये घाऊक महागाईचा वार्षिक दर (WPI) १४.५५ टक्क्यांवर गेला आहे. हा दर मार्च २०२१ मध्ये ७.८९ टक्के होता. याचा अर्थ घाऊक बाजारातील महागाई मागच्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. नैसर्गिक वायू, पेट्रोलियम उत्पादने, खनिज तेल, मूलभूत धातू इत्यादीच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती वाढत असल्यामुळे त्याचा परिणाम एकूणच सर्व स्तरातील महागाईवर झाला आहे. अशा महागाईच्या मुद्द्यावर आकडेवारीसह भाष्य केले आहे.
https://www.facebook.com/313596615444842/posts/2321228494681634/
आता जनतेनेच धार्मिक मुद्द्यांकडे लक्ष न देता महागाईवर सातत्याने केंद्र सरकारला प्रश्न विचारत राहिले पाहीजे.असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आले आहे.


