मुंबई : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं असलं तरी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्रात देखील सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे.
याच तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांच्या घरांचं मोठं नुकसान झाले आहे. झाडांची पडझड होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अशावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना सावली देण्यासाठी 6 गाड्या भरून सिमेंट पत्रे पाठवले आहेत. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांतून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात हि मदत पोहचली आहे. आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ, कणकवली, सावंतवाडीमध्ये ह्या गाड्या रवाना केल्या आहेत अशी माहिती सध्या मिळत आहे.
वादळामुळे नुकसान झालेल्या सिंधुदुर्गवासियांना जास्तीत जास्त मदत देण्याचे काम येत्या काळात शिवसेनेच्या माध्यमातून केले जाणार असल्याचं आमदार वैभव नाईक यांनी सांगितलं. तसंच त्यांनी एकनाथ शिंदे यांचेही आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेले पत्रे घरांचं नुकसान झालेल्या सर्वांना दिले जाणार आहेत. असे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, या वादळानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप हे सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. तौत्के चक्रीवादळाचा गुजरातला जोरदार तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी गुजरातसाठी तब्बल एक हजार कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. परंतु पंतप्रधान मोदींनी गुजरातला मदत केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राला देखील या चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे मोडी यांनी महाराष्ट्राला देखील मदत करणे अपेक्षित आहे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
महत्वाच्या बातम्या
- आरटीओ कार्यालयाची फसवणूक! बनावट कागदपत्राच्या सहाय्याने रिक्षा स्क्रॅप केल्याचा अहवाल केला सादर
- ‘मोदी कशाचीही जबाबदारी घेत नाहीत’, भाजप खासदाराचा घरचा आहेर
- मोठी बातमी! केंद्राकडून ‘म्युकरमायकोसिस’चा साथरोग कायद्यात समावेश, नवीन नियम लागू
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा म्हणजे लिपस्टिक दौरा’, नितेश राणेंची टीका
- ‘आम्हाला बोलू दिले नाही तर मग बोलवलं कशाला?’, ममता पंतप्रधान मोदींवर भडकल्या


