मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रदीर्घ संघर्षानंतर बुधवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एवढेच नाही तर त्यांनी विधान परिषदेचे सदस्यत्वही सोडले. आपल्याच लोकांनी दगा दिला, असे सांगत ते मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. शिवसेनेतले एकून ३९ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केले. गेले ९ दिवस चाललेल्या या नाट्यात शिवसेनेला रोज नवीन धक्के बसले. अखेर काल (बुधवार) उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर भाजप आणि शिंदे गटात सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली होत आहेत. आज एकनाथ शिंदे गोव्यावरुन मुंबईसाठी रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्हाला आनंद नाही. सर्व ५० आमदारांची एकच मागणी होती. आमदारांना मतदारसंघात अडचणी होत्या. तेव्हा आपण बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाऊयात अशी सर्व ५० आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी होती. वेळीच निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. आम्हाला कोणालाही आनंद नाही. उद्धव ठाकरेंबद्दल आमच्या मनात कालही आदर होता आणि आजही आहे”.
दिपक केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे आजही आमचे नेते आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे आम्हाला आनंद नाही तर, दुःख झाले आहे. त्यामुळे कोणीही याचं सेलिब्रेशन करू नये असे म्हणत त्यांनी भाजपकडून काल करण्यात आलेल्या जल्लोषावर नाव न घेता नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ते गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत आहे.
मंत्रिपदांबाबत एकनाथ शिंदे यांचे ट्वीट! म्हणाले…
राजकारणात झालेल्या या ऐतिहासिक घटनेमुळे राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा ‘मी पुन्हा येईल’ हा नारा खरा ठरणार का? या चर्चांना उधाण आलं आहे. भाजप सोबत किती आणि कोणती मंत्रिपदे जाणार याबाबत वावड्या उठायला लागल्या आहेत. मंत्रिपदाच्या याद्या अनेक ठिकाणी व्हायरल होत आहेत. मात्र बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका अशा आशयाचं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

