🕒 1 min read
मुंबई- भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अखेर भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्याक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल घोषणा केली आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाची औपचारिकता उद्या पूर्ण केली जाणार आहे.
दरम्यान,जळगावात आज स्वतः एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला सोडण्याची घोषणा केली आहे. पक्ष सोडत असताना एकनाथ खडसे यांनी भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केले. गेल्या 40 वर्षांपासून भाजपमध्ये काम करणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजप पक्षातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले आहे. पक्षात बाहेर पडत असल्याची घोषणा करताना एकनाथ खडसे यांचा गळा भरून आला होता. फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्यामुळे बाहेर पडत असल्याचे खडसेंनी सांगितले.
जेव्हा भाजप खेड्यापाड्यात पोहोचली नव्हती. तेव्हापासून गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्यासह अनेक नेत्यांसोबत काम करत आलो. आतापर्यंत पक्षात काम करत असताना मला अनेक पदं मिळाली हे मी नाकारत नाही. मी कुठल्याही नेत्यावर टीका केली नाही. मी जेव्हा मुख्यमंत्रिपदाचा दावा केला होता, त्यानंतर माझ्यावर अनेक आरोप झाले. अनेक वेळा चौकशी झाल्या’ असं खडसे यांनी सांगितले.
खडसेंचा बालेकिल्ला असणाऱ्या मुक्ताईनगरात कालपासून तयारीला सुरुवातही झाली होती.एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी बॅनरवरुन कमळ गायब केलं आहे.खडसेंच्या मुक्ताईनगरात समर्थकांनी बॅनरबाजीला सुरुवात केली आहे.’नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण’असे बॅनर समर्थकांनी झळकावले आहेत.एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी कार्यकर्त्यांनी मुंबईला जाण्यासाठी आपल्या गाड्यांवरती स्टिकर्स लावले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांवर खडसेंची वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर खडसे यांना गृहनिर्माण, जलसंपदा किंवा कृषी अशा मोठ्या खात्याची जबाबदारी मिळण्याची चर्चा आहे. दरम्यान, गृहनिर्माण खातं सध्या जितेंद्र आव्हाड तर जलसंपदा खातं जयंत पाटील यांच्याकडे आहे.खड्सेंचा मान राखण्याचा पूर्ण प्रयत्न राष्ट्रवादी करेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. गरज पडलीच तर शिवसेनेशी चर्चा करून कृषी खाते देखील दिले जाईल अशी चर्चा आहे.
दरम्यान,पक्षासाठी ही चिंतनाची बाब आहे, खडसेंसारख्या नेत्याने पक्षाची 40 वर्षं सेवा केली आहे. त्यांनी जाऊ नये असं मला सतत वाटायचं,अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.हे धक्कादायक आणि दुःखद आहे, त्यांच्या मनात खंत होती, माझ्यावर अन्याय होतोय असं त्यांना वाटायचं, तो चर्चेतून संपेल असं वाटायचं,असंही मुनगंटीवार यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलंय.
महत्वाच्या बातम्या-
- खडसेंच्या राजीनाम्याची चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
- नाथाभाऊंचे पक्ष सोडणं धक्कादायक आणि दुःखद – मुनगंटीवार
- नाथाभाऊ तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है – राजीव सातव
- फक्त खडसेच नाही तर अनेकजण राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक ; जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य
- नाथाभाऊ जाऊ नये म्हणून प्रामाणिक प्रयत्न केले, ‘त्यांना शुभेच्छा’ : केशव उपाध्ये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

