टीम महाराष्ट्र देशा : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांच्या उमेदवारीला विरोध होताना दिसत आहे.
राहुरी विधानसभेचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मोभारकर, अमोल जाधव आणि शंकर राऊत यांनी केली आहे. अहमदनगरमधील गुन्हेगार आणि कायदा पायदळी तुडवणाऱ्या आमदार शिवाजी कर्डिले यांना पाठीशी घालण्याचं काम सोडून द्यावं, तसंच आगामी निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी देऊ नये जर दिली तर पिडीत नागरिक आत्मदहन करतील असं विधान केले आहे.
याविषयी मोभारकर जाधव आणि राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात ‘शिवाजी कर्डिले हे नगर जिल्ह्यात गाजलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी आहेत. लाचलुचपत विभागाकडे अनेक तक्रारी व पाठपुरावा करुनही आमदार शिवाजी कर्डिले, अरुण जगताप आणि भानुदास कोतकरांनी हजारो कोटींच्या मालमत्ता हडप केल्या. डॉक्टरांसारख्या प्रतिष्ठित लोकांनाही दिवसाढवळ्या पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांची संपत्ती हडप केली आहे तर इतरांचे काय असं त्यात म्हटले आहे.
दरम्यान शिवाजी कर्डिले यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असूनही ते पक्षाचे आमदार आहेत. जर राहुरी मतदारसंघातून कर्डिले यांनी उमेदवारी दिली तर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन मतदारांना करु असंही पत्रकात म्हटले आहे.


बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
