🕒 1 min read
औरंगाबाद : शिवसेना आल्यापासून औरंगाबाद लोकसभा मतदार संघात एकदाही विजय मिळवता न आलेल्या औरंगाबाद काँग्रेसच्या जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचे काम काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. नाना पटोले यांच्या औरंगाबाद दौऱ्यादरम्यान त्याची झलक देखील पाहावयास मिळाली होती. आता काँग्रेसच्या कार्यकारणीमध्ये औरंगाबादमधून पाच चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यातही जुने आणि नवे यांचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावरुन काँग्रेसमधील अंतर्गत गटा-तटाच्या राजकरणाचा योग्य मेळ साधल्याचे दिसून येते.
काँग्रेच्या कार्यकारणीमध्ये आधीपासूनच असलेले प्रकाश मुगदीया यांच्यासोबत माजी आमदार सुभाष झांबड यांची वर्णी नव्या कार्यकारणीमध्ये लागली आहे. त्याच बरोबर नव्या आणि जुन्या पीढीची सांगड घालत जितेंद्र देहाडे आणि औरंगाबाद मनपा मधील काँग्रेसचा चेहरा असलेले डॉ. जफर अहेमद खान यांची वर्णी लागली आहे. त्याच बरोबर युवा चेहरा म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे युथ काँग्रेसचे खालेद पठाण यांचीही वर्णी लागली आहे. या माध्यमातून शहर अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष आणि माजी जिल्हा अध्यक्ष अशा अनेक गटांमधील वादाला खतपाणी न घालता, जो पक्षासाठी काम करायला तयार आहे, त्याला संधी मिळेल, असा संदेशच प्रदेश अध्यक्षांनी दिला असल्याचे लक्षात येते.
नाना पटोले यांनी या संदर्भातले संकेत आधीच दिले होते. प्रत्यक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच संधी देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीला सामोरे जातांना ‘स्वबळा’चा नारा काँग्रेस देत आहे. त्यामुळे पक्ष मजबूत करण्याकडे काँग्रेसचा कल आहे. त्यासाठी प्रदेश काँग्रेसमध्ये समाविष्ट झालेली ही नवी टीम कामाला लागेल, असे चित्र सध्यातरी आहे.
काँग्रेसमध्ये आधीपासूनच गटाचे राजकारण पाहायला मिळते. याच राजकारणामुळे काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. त्या नंतरही अनेकदा हे गटाचे राजकारण पाहायला मिळाले. मात्र, अशा राजकारणाला थारा देणार नसल्याचे पटोले यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यात आता नव्या नियुक्त्यांवरुनही ते दिसून येतय. असे असले तरी औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसचा पाया मजबूत राहिलेला नाही. सध्याच्या घडीला जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. इतकच काय मनपामध्ये लक्ष वेधले जाईल असे संख्याबळही नाही. त्यामुळे नव्या दमाने कामाला लागलेल्या काँग्रेसला चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
त्यात या नव्या नियुक्त्यांमुळे नाराज झालेल्या काँग्रेसी नेत्यांचा एक वेगळा गटही आहेच. त्या गटाच्या नाराजीचाही काँग्रेसला सामना करावा लागणार आहे. आता करी कामाला लागा, असा संदेशही या गटाला प्रदेश काँग्रेसने दिला आहे. यात महत्त्वाचे म्हणजे जिल्हाध्यक्ष बदलाची चर्चा आता संपली आहे. त्यामुळे जिल्हा कार्यकारणी कशा प्रकारे काम करते, ते पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
- एकनाथ खडसेंना दणका; ईडीने केली ५ कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
- ‘अफगाणिस्तानातील हिंदू, शिखांना स्वीकारले; मला नाही’, महिला खासदाराची नाराजी’
- शिवेसनेबद्दल काही त्यांनी वक्तव्य केलं तर आम्ही सोडणार नाही; राजन साळवी यांचा इशारा
- योद्धा पुन्हा मैदानात…राणेंची जन आशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा सुरु होणार
- ‘राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला ५१ लाखांचे बक्षीस’, विश्व हिंदू सेनेच्या अध्यक्षांचे वादग्रस्त विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
