मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात शनिवारी व रविवारी संपूर्ण लॉकडाऊन म्हणजेच वीकेंड लॉकडाऊन करण्यात आला असून सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी असेल. तर, दिवसभर जमावबंदी असेल.
रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.
मात्र, राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केल्यानंतर राज्यभरातील सामान्य जनतेसह व्यापाऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. यामुळे आता यात बदल केला जावा अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील कडक निर्बंधांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.
‘फोनद्वारे झालेल्या चर्चेत दोन दिवसांचा लॉकडाऊनचा विषय असल्याने आम्ही सहमती दर्शविली. मात्र, ज्याप्रकारे इतरही पाच दिवस लॉकडाऊन सदृश निर्बंध घालण्यात आलेत, त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करत आहेत. हे निर्बंध घालताना विविध क्षेत्रांचा विचार अजीबात करण्यात आलेला नाही.’ असं भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
वाचा देवेंद्र फडणवीस यांचे पत्र, जसेच्या तसे –
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतोय आणि त्यामुळे कठोर निर्बंध लावावे लागतील, असा आपला दूरध्वनी आला होता. दोन दिवसांचा लॉकडाऊनचा विषय असल्याने आम्ही सहमती दर्शविली. मात्र, ज्याप्रकारे इतरही पाच दिवस लॉकडाऊन सदृश निर्बंध घालण्यात आलेत, त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करत आहेत. हे निर्बंध घालताना विविध क्षेत्रांचा विचार अजीबात करण्यात आलेला नाही.
अनेक क्षेत्रांना या लॉकडाऊनचा मोठा फटका बसत असून, अर्थव्यवस्थेलाही त्यामुळे मोठा फटका बसत आहे. ज्या प्रकारचे निर्बंध प्रत्यक्षात लादण्यात आलेत, ते पाहता हा एकप्रकारे अघोषित महिनाभराचा लॉकडाऊनच आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय अशा सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक आहे. अनेक बाबतीत संलग्नता पाहण्यात आलेली नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर वाहतूक खुली ठेवताना गॅरेज आणि स्पेअर पार्टस दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहेत. असेच प्रकार अनेक बाबतीत झाले आहेत.त्यामुळे पुन्हा एकदा सर्व छोट्या-छोट्या घटकांशी चर्चा करून त्यांना दिलासा देण्यात यावा.
कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा देण्याबाबत, तसेच सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र.. pic.twitter.com/1U9LuvklhW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 6, 2021
सर्वांना विश्वासात घेऊन, गरिबांचे जीवन आणि अर्थकारण दोन्हीही प्रभावित होणार नाही, अशा पद्धतीने नव्याने निर्बंधांबाबतची अधिसूचना जारी करण्यात यावी. कोरोनाला रोखणे महत्त्वाचे आहेच. पण, कोरोना रोखताना अन्य मानवनिर्मित कारणांमुळे नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशीही कृती होता कामा नये. आपण तत्काळ यासंदर्भात पाऊले उचलावीत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रातून केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- माझी जबाबदारी, मीच विसरलो…भाजप नेत्याची मुख्यमंत्री ठाकरेंवर खोचक टीका
- मुंबईत भाजपचा शिवसेनेला धक्का; ‘या’ माजी आमदाराने केला भाजपमध्ये प्रवेश
- बच्चू कडूंचा रौद्रावतार; रुग्णालय मेसमधील स्वयंपाकीच्या लगावली कानशिलात !
- बाजारात इलेक्ट्रीक कार्सची स्पर्धा; टेस्लाच्या कारला ‘ही’ कंपनी देणार टक्कर
- मोठी बातमी : MPSC परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

