Share

४५ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी कोविड लसीकरणाला आजपासून सुरुवात

Published On: 

नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून लसीकरण करुन घेणे हा त्यावरील एकमेव उपाय आहे. जिल्ह्यात नवीन स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी जनतेने आरटीपीसीआर तपासणी करुन आरोग्य यंत्रणेने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यासोबतच गृह विलगीकरणातील रुग्णांनी विशेष दक्षता घ्यावी. लॉकडाऊनसंदर्भातील राज्य शासनाच्या निर्देशाचे कडकपणे पालन करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली.

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीस मुंबईहून गृहमंत्री अनिल देशमुख, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रश्मी बर्वे, महापौर दयाशंकर तिवारी, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सर्वश्री गिरीश व्यास, अभिजित वंजारी, विकास कुंभारे, ॲड. आशिष जयस्वाल, समीर मेघे, टेकचंद सावरकर, राजू पारवे, प्रवीण दटके आदी लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. अमितेश कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महापालिका अपर आयुक्त जलज शर्मा, आयएमएच्या अध्यक्षा अर्चना कोठारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, टास्क फोर्सचे पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नवीन स्ट्रेनच्या कोरोना विषाणूचे रुग्ण जिल्ह्यात आढळून आले असून नागरिकांनी आरटीपीसीआर ही तपासणी प्राधान्याने करण्याचे आवाहन करताना पालकमंत्री म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे तपासण्यांची संख्या वाढविण्यासाठी अडीचशे केंद्रे सुरु केली आहेत. ती वाढविण्यासाठी केंद्र शासनाला विनंती करण्यात आली आहे. मास्कचा वापर,सोशल डिस्टन्सिंग व नियमित हात धुणे यासह कोरोना लस घेण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणे त्यासोबतच रुग्णालयातील बेडची संख्या वाढविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. बेडच्या उपलब्धतेसंदर्भात समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून जनतेलाही बेडच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

कोरोनाबाधित रुग्ण होमक्वारन्टाईन असताना बाहेर फिरत असल्याच्या तक्रारींबाबत डॉ. राऊत म्हणाले, अशा रुग्णांसाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाने संहिता तयार करावी व त्यानुसार कडक निर्बंध लागू करावे. रुग्णालयात बेड उपलब्ध होण्यासाठी बेड मॅनेजमेंट, ऑक्सिजनचा पुरवठा तसेच रेमडिसिवर या औषधाची उपलब्धता यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना करताना ते पुढे म्हणाले की, कोविड हॉस्पिटलमधील रुग्ण व नातेवाईक यांचा संवाद तसेच आहार व्यवस्था चोख ठेवावी. ब्रिटेन, दक्षिण आफ्रिका व ब्राझिल येथील नवीन स्ट्रेनचे रुग्ण आढळल्यामुळे यासंदर्भातील उपचाराबाबत प्रोटोकॉल तयार करावा व त्यासंदर्भातील संपूर्ण माहिती जनतेला उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिलेत.

कोरोनासंदर्भातील तपासणी, लसीकरण आदीबाबतची माहिती लोकप्रतिनिधींना उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच कोरोना रुग्णांच्या औषोधोपचार आदीबाबत नियंत्रणासाठी विशेष नोडल ऑफिसरच्या नियुक्त्या करण्यात येणार असून ग्रामीण भागासाठी संबंधित तहसीलदार तर शहरासाठी उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करावी असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

ग्रामीण भागात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून यामध्ये काटोल, नरखेड, सावनेर,कामठी, हिंगणा आदी क्षेत्रात तपासण्यांचे प्रमाण व लसीकरण वाढविण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करावा, अशा सूचना गृहमंत्री देशमुख यांनी दिल्या.

जिल्ह्यात सरासरी अडीचशे लसीकरण केंद्र आहेत. यापैकी शहरात 81 तर ग्रामीण भागात 163 केंद्रे आहेत. सहा लाख नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी केंद्रांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन त्यांची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच लसीकरण केंद्र वाढविणे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे बेडची संख्या वाढवून रुग्णांना सुविधा उपलब्ध करुन देणे यासोबतच खासगी रुग्णालयात शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार उपचाराची सुविधा आदीबाबत लोकप्रतिनिधींनी विविध सूचना केल्या. जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी या सूचनांची तात्काळ पूर्तता करावी, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. राऊत यांनी प्रशासनाला दिले.

महापौर तिवारी यांनी शहरात कोविड रुग्णांसाठी तात्काळ पाचशे बेड वाढविण्याची आवश्यकता आहे. यासोबतच बाधित रुग्णांना रेमडिसिव्हीर इंजेक्शन देण्यासाठी स्वतंत्र रुग्णालय असावे. गृहविलगीकरणातील रुग्णांना योग्य मार्गदर्शन करुन उपचार केल्यास बेडची संख्या वाढवू शकेल असे यावेळी सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी बाधित रुग्णांना ग्रामीण भागात गृह विलगीकरणासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे क्वारंटाईन केंद्र सुरु करुन अशा रुग्णांची व्यवस्था करावी, अशी सूचना केली. खासदार डॉ. महात्मे यांनीही विविध सूचना केल्या.

मुंबई, ठाणे, पुणे यानंतर नागपूरमध्ये लसीकरण चांगले झाले, असून जिल्ह्यात 3 लाख 59 हजार 953 लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात केंद्राची संख्या वाढवून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत असल्याची माहिती डॉ. संजीव कुमार यांनी यावेळी दिली.

प्रारंभी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी लसीकरण मोहीम, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग यावर विशेष भर देण्यात आला आहे. लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी नागरिकांना बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे. प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले असून प्रत्येक केंद्रावर दोनशेपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागात 163 केंद्राद्वारे लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून तपासणी वाढविण्यात आली आहे. कोरोनाच्या सर्वाधिक रुग्ण असलेल्या भागात 4 हजार 402 कन्टोन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. ज्या गावात पाचपेक्षा जास्त रुग्ण आहेत अशा तालुक्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कळमेश्वर- 41, काटोल-20, सावनेर-64, नागपूर ग्रामीण-30, मौदा-10 हिंगणा -21, पाशिवनी-14, कामठी-21 या गावांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!