मुंबई : यंदा राज्यात कापसाचं उत्पादन चांगल्या प्रकारे झालं आहे. त्यानुसार भारतीय कापूस निगम महामंडळ (सीसीआय) मार्फत आणि कापूस फेडरेशनच्या वतीनं राज्यात अनेक ठिकाणी कापूस खरेदी सुरू झाली होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यानं शेतकऱ्यांना त्याठिकाणी आपला माल घेऊन जाता येत नाही आणि तसं करणं योग्यही नाही. लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला असला तरीही शेतीपूरक व्यवसायांना त्यातून मुभा देण्याची राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका सुरुवातीपासून राहिली आहे.
औषधाची दुकानं, औषध उत्पादन करणारे कारखाने यांनाही सुरू ठेवण्याची सवलत देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर साधारण येत्या २० एप्रिलपासून राज्यात पुन्हा कापूसखरेदी सुरू करण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याची माहिती पणन व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
कापूस खरेदीबाबत आज मुंबईत बैठक झाली. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशमधील विविध जिल्ह्यांत कापूस खरेदी सुरू करावी. ही खरेदी सुरू होत असताना शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा कापूस केंद्रावर आणावा. त्यासाठी त्यांनी नियोजन करावं.
हे नियोजन करत असताना तिथले स्थानिक कापूस खरेदी केंद्र आणि स्थानिक कमिटी यांनी त्यात पुढाकार घ्यावा असं आवाहनही बाळासाहेब पाटील यांनी केलं. जे शेतकरी ऑनलाईन बुकींग करत आहेत किंवा फोनच्या माध्यमातून आपला कापूस कोणत्या प्रतीचा आहे किंवा किती प्रमाणात आहे हे कळवत आहेत त्यांना कापूस कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळी केंद्रावर आणावा, याबाबतच्या सूचना दिल्या जातील. कापूस केंद्रावर आल्यानंतर त्याची प्रत तपासून आणि वजन करून कापूस खरेदी केली जाईल व त्यानंतर पुढची प्रक्रीया केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.


