मुंबई : जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल हे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळी प्रकाशपर्वाचा सण असल्याने प्रदूषण आणि गर्दी टाळून तो साधेपणाने आणि आनंदाने साजरा करावा, सुख समृद्धीसाठी उघडलेल्या आपल्या घराच्या दारातून कोरोनाला आत येऊ देऊ नये, असे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांनी फटाक्यांवर बंदी घालून आपल्यावर आणीबाणी लादायची नसून परस्पर विश्वासातून आपल्याला पुढे जायचे आहे असेही म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमाद्वारे राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना संकटकाळात राज्यातील सर्वधर्मियांनी त्यांचे सण साधेपणाने साजरे करून शासनाला सहकार्य केले आहे. इथून पुढेही हे सहकार्य आवश्यक आहे. धूर आणि प्रदुषणामुळे कोरोना नियंत्रणासाठी आतापर्यंत आपण केलेले प्रयत्न आणि त्याला प्राप्त झालेले थोडे यश हे बेफिकीरीने वागून वाहून जाऊ शकते ! याकडे राज्यातील जनतेचे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला प्रकाशपर्व दीपावलीच्या शुभेच्छाही दिल्या.
दिवाळीनंतरचे दिवस हे हिवाळ्याचे दिवस असल्याने आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, इटली, स्पेन, इंग्लंड, नेदरलँडसारख्या देशात कोरोनाची दुसरी जबरदस्त लाट आलेली दिसून येत आहे. काही ठिकाणी पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे.
दुसऱ्या टप्प्यात हा विषाणु दुप्पट वेगाने वाढतो आहे. आपल्याला भारतात आणि महाराष्ट्रात ही दुसरी लाट येऊच द्यायची नाही त्यामुळे शिस्तीचे पालन आवश्यक आहे. कोरोनाशी लढताना आपण राज्यभर जम्बो आरोग्य सुविधा उभ्या करत आहोत, आपले डॉक्टर, नर्सेस आणि इतर कोविड योद्धे हे आपल्यासाठी गेली कित्येक महिने अथक परिश्रम घेत आहेत. अस मुख्यमंत्री म्हणाले
महत्वाच्या बातम्या
- आनंदाची बातमी : राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या एक लाखाच्या आत
- सनरायजर्स हैदराबादावर विजय मिळवत दिल्ली थेट फायनलमध्ये
- साधा प्रवक्ता बनवला असता तरी भाजपला मान वर काढू दिली नसती; शिवसेना नेत्याने व्यक्त केली खदखद
- …त्यामुळे यंदा दिवाळी साजरा न करता ‘त्यांच्या’ नावाने शिमगा साजरा करा!
- कोरोना टाळण्यासाठी नागरिकांनी जीवनशैली बदलण्याची आवश्यकता – उद्धव ठाकरे


