मुंबईः मोदी सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ (Agnipath) या सैन्यभरती योजनेला देशभरातून तीव्र विरोध होत आहे. देशातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांनी या योजनेविरोधात जोरदार आंदोलन केले आहे. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. उत्तरेतील काही राज्यांमध्ये रेल्वे पटवले गेले आहे. अग्निपथ आंदोलनाचे लोण आता देशभर पसरत आहे. यावर आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, “सैन्यात अग्रीपथ योजनेतून ठेकेदारीवर भरती केल्यास संपूर्ण सैन्यदलाची प्रतिष्ठा रसातळाला जाईल. भारतीय सैन्यदलाचा, सुरक्षा दलाचा हा अपमान आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतीच जाहीर केलेल्या अग्नीपथ या सैन्यभरती योजनेवर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना राऊतांनी हे वक्तव्य केलं आहे. भारतीय सैन्यदलात ४ वर्षांच्या भरतीसाठी अग्नीपथ योजना केंद्र सरकारतर्फे सुरु करण्यात आली आहे. मात्र आता देशातील विविध राज्यातून या योजनेला जोरदार विरोध होत आहे. ४ वर्षांच्या कंत्राट पद्धतीने सैन्यभरती होणार असून त्यानंतर नोकरीची हमी नाही किंवा पेन्शनची सुविधा ही नाही. रँक नाही, यामुळे योजनेत भरती झालेल्या तरुणांच्या भवितव्य सुरक्षित नाही, अशी टीका सरकारवर होत आहे.
संजय राऊत म्हणाले, मोदी सरकारची (Modi Sarkar) प्रत्येक योजना अपयशी ठरलेली आहे. १० लाख नोकऱ्या द्यायची घोषणा केली. महागाई कमी करण्याची घोषणा केली. आता ही नवी अग्नीपथ योजना काढली. सैन्य पोटावर चालतं. शिस्त असते. सैन्यात ठेकेदारी पद्धतीनं भरती होणार असेल तर भारतीय सैन्याची प्रतिष्ठा रसातळाला जाईल. ठेकेदारीवर गुलाम आणि सध्याचा मीडिया ठेकेदारीवर घेतला जाऊ शकतो. सैन्य ठेकेदारीवर कसे घेतले जाऊ शकते? त्यांच्यावर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. त्यांना ठेकेदारी पद्धतीवर चार वर्षांसाठी कामावर ठेवणं हा भारतीय सैन्यदलाचा अपमान आहे. राष्ट्रीय सुरक्षा दलाचा अपमान आहे.
मोदी सरकारच्या या अग्निपथ योजनेत २३ वर्षांपर्यंतचे तरुण अग्नीपथ भरती प्रक्रिया साठी अर्ज करू शकतात. अग्नीपथ योजनेत केवळ १७ ते २३ वर्षे वयोगटातील तरुण अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. योजनेच्या सुरुवातीच्या कालावधीत सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ४ वर्षानंतर काही भरती झालेल्यांना सैन्यात कायमस्वरुपी पद मिळेल. तर बहुतेकांची सैन्यातील सेवा ४ वर्षानंतर संपुष्टात येईल. ज्यांची सेवा संपुष्टात येईल, त्यांना अनेक प्रकारच्या संधींमध्ये सवलत देण्याची घोषणा सरकारने केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

