मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर यायला लागली असून, आता तीन पक्षातील विसंवाद जाहीरपणे दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यातच आता माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार आरोप केले असून, शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, असे म्हटले आहे.
राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. मग जर दोन कॉंग्रेस जर एक होऊ शकत नाहीत तर मग आम्ही त्यांच्या विचारांचे होणे शक्य नाही. जरी राज्यात आघाडी सरकार असले तरीही आम्ही आघाडी सैनिक नाही आहोत. आम्ही शिवसैनिक आहोत शिवसैनिकच राहणार आहोत असं म्हणत त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान यावर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. यावर बोलताना ते म्हणाले कि, अनंत गीते यांचे हे बोलणे चुकीचे आहे. शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला असं नाही, तर त्यांना काँग्रेसमधून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असं नाही.
शिवसेनेला भवितव्य उज्वल करायचं असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहणं त्यांचं नुकसान आहे. अडीच वर्षांचा जो फॉर्म्यूला आहे त्यावर एकमत करुन भाजपा-सेनेने एकत्र यावं आणि राज्याच्या विकासाला प्रगती द्यावी. तसेच शरद पवारांवर इतका गंभीर आरोप केला आहे तर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहू नये. शिवसेनेने पुन्हा एकदा स्वगृही परतत भाजपा, आरपीआयसोबत मिळून बाळासाहेबांचं शिवशक्ती भिमशक्ती स्वप्न साकार केलं पाहिजे, असा सल्ला देखील यावेळी रामदास आठवले यांनी शिवसेनेला दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- …त्या सगळ्या गोष्टींच्या वेदना गीते यांच्या वक्तव्यामधून बाहेर आल्या-प्रवीण दरेकर
- राज्यपालांनी ‘ती’ मागणी करणे हे संसदीय लोकशाही पद्धतीस मारक; मुख्यमंत्र्यांचे जशास तसे उत्तर
- आरसीबीचा निळ्या जर्सीद्वारे कोवीड योद्ध्यांना सलाम
- कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांसाठी स्वतंत्र योजना- अजित पवार
- मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत एखाद्या मंत्र्यांचा राजीनामा वाचण्याची ती पहिलीच वेळ असेल – राठोड


