पणजी : गोव्यात परिस्थिती गंभीर होत असल्याचं चित्र आहे. पणजी येथील गोवा मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये १५ रुग्णांच्या मृत्यूमुळे खळबळ माजली असतानाच शुक्रवारी आणखी १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोविड वॉर्डमध्ये मध्यरात्री २ ते पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजनची पातळी खालावल्याने १३ रुग्णांनी आपला जीव गमावला. ऑक्सिजनचा पुरेसा साठा नसल्याने गोव्यातील या रुग्णालयात गेल्या चार दिवसांत ७४ लोकांनी आपला जीव गमावला असून प्रशासन मात्र रुग्ण मोजणीसंदर्भातील गोंधळ असल्याचा दावा करत आरोप-प्रत्यारोप करत आहे.
या प्रकरणी गोवा फॉरवर्ड पार्टीने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, राज्य सरकारने ऑक्सिजन पुरवठ्यावरून सुरू असलेल्या या गोंधळप्रकरणी चौकशी समिती नेमली आहे. ही तीन सदस्यीय समिती तीन दिवसांत अहवाल सादर करणार आहे.
गोव्यातील या रुग्णालयात मंगळवारी रात्रीपासून परिस्थिती भीषण झाल्याचं चित्र आहे. मंगळवारी २६, बुधवारी २० आणि गुरुवारी १५ रुग्णांनी आपला जीव गमावला. विशेष म्हणजे गोवा मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल हे राज्यातील सर्वात मोठं कोविड रुग्णालय आहे.
गोव्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होते आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट गोव्यात आहे. गुरुवारी रुग्णवाढीचा दर ४८.१ टक्के होता. गेल्या २४ तासांत गोव्यात २ हजार ४९१ रुग्णांची नोंद झाली आहे व ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कुठून हे नग मिळतात?’, माजी मुख्यमंत्र्यांवर जितेंद्र आव्हाड संतापले
- ‘राऊत साहेब, डोळे उघडा.. किती यादी सांगू?’, भाजपचे प्रत्युत्तर
- ‘..पेट्रोल भरायला गेलो तरी तिथेही फोटो असतो’, अजित पवारांचा मोदींना चिमटा
- सलूनचालकाची आत्महत्या! अनेक दिवसांपासून होती आर्थिक विवंचना
- मंठ्यात नागरिक दुसऱ्या ‘डोस’च्या प्रतीक्षेत


