“मला वाटतं बीसीसीआयने…”; विराट कोहली पत्रकार परिषदेला न येण्याबाबत प्रशिक्षकांची प्रतिक्रिया

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने शेवटचा मीडियाशी संवाद साधला होता. त्यानंतर तो एकाही पत्रकार परिषदेत दिसला नाही. दरम्यान त्याचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनीही यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. विराट दोन्ही कसोटीत अद्याप पत्रकार परिषदेला उपस्थित न राहिल्याने ही आश्चर्य व्यक्त करणारी गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सेंच्युरियन कसोटीच्या पूर्व आणि सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदांना अनुक्रमे राहुल द्रविड आणि केएल राहुल यांनी हजेरी लावली होती, तर जोहान्सबर्ग कसोटीच्या आधी आणि नंतरच्या पत्रकार परिषदेत द्रविड हा एकमेव उपस्थित होता.

एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान राजकुमार शर्मा यांना जनरल प्रोटोकॉलमध्ये अचानक झालेल्या या बदलाबद्दल विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, “याचे कारण समजले नाही. मला वाटतं बीसीसीआयने कोणाला संबोधित करायचं याविषयी काही नवे नियम केले असतील किंवा मीडिया मॅनेजरला अधिक अधिकार दिले असतील, की कर्णधार जाणार की नाही हे तो ठरवेल.”

“दोन्ही सामन्यांच्या आधी आणि नंतर कर्णधार दिसला नाही यामागे काही कारण असावे. हा बदल अचानक झाला किंवा प्रत्यक्षात काही बदल झाला, की निव्वळ योगायोग आहे हे सांगणे कठीण आहे,” असे शर्मा यांनी सांगितले.

विराटला पत्रकार परिषदेपासून वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे का, असा प्रश्न राजकुमार शर्मा यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर दुसऱ्या सामन्यात केएल राहुल आला असता. पण तोही आला नाही, याचा अर्थ काही निर्णय घेतला जाऊ शकतो की कर्णधाराऐवजी प्रशिक्षक बोलतील. प्रशिक्षकही पत्रकार परिषदेला आले तर काही गैर नाही.”

महत्वाच्या बातम्या :