मुंबई : यंदा संपूर्ण देश कोरोनाच्या संकटातून जात आहे. अशातच राज्यात परतीचा पाऊस, कीड, अतिवृष्टी, आदी संकटांची भर पडत आहे. तर, मुंबईच्या चिंतेत अजून एक भर पडली असून अवघी मुंबई वीजसंकटात सापडली आहे. मुंबईसह उपनगरामध्ये आज सकाळी अचानक वीज पुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे लोकल सेवाही ठप्प झाली आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते जवळपास सर्वच क्षेत्रांना याचा मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशीदेखील त्यांनी चर्चा केली व मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. भविष्यात परत अशी घटना घडू नये यासाठी सतर्कता बाळगावी असेही त्यांनी सांगितले.
मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत तसेच कोण जबाबदार आहेत त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. दरम्यान सकाळी मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना वीजपुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणेकरून अडचण होणार नाही याबाबत महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या.
या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले. उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असे निर्देश त्यांनी दिले.
मात्र या सर्व प्रकारामुळे राज्य सरकारची चांगलीच नाचक्की झाली आहे. सरकारवर आता सर्व स्थरातून टीका होत असून दिग्दर्शक अशोक पंडित यांनीही ”महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पॉवरलेस झाल्याची टीका केलीय. यासाठी ते आता रिपब्लिक आणि अर्नब गोस्वामीला दोष देणार नाही अशी अपेक्षा. मुंबईच्या इतिहासामध्ये अशाप्रकारे कधीच वीजपुरवठा खंडित झाला नव्हता. हे ग्रीड फेल्युअर म्हणजे सरकार प्रशासनामध्ये अपयशी ठरत असल्याचे हे उदाहरण आहे, असे पंडित यांनी आपल्या ट्विटर अकाऊँटवरुन म्हटले आहे.
दरम्यान, यावरून आता विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. भाजपचे नेते व आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. “राज्य सरकार नियोजन शुन्य, व्यवहार शुन्य आणि कल्पना शुन्य असल्याने आज विद्यार्थी, प्रवासी, रुग्ण आणि जनतेचे अचानक गेलेल्या वीजेविना हाल झाले. याबाबत ज्या अधिकाऱ्यांचे नियोजन चुकले त्यांच्यावर कारवाई करा. ऊर्जा मंत्र्यांनी तातडीने खुलासा करावा.”अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Bihar Election 2020: “मोदी हैं तो मुमकीन हैं, नितीश हैं तो संभव हैं”
- प्रत्येकाला लस मिळण्यासाठी कोरोनावरील एकाहून अधिक लशींचा वापर सरकार करणार
- “मेट्रो कार शेड कांजूरला नेण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा फसवी”
- ‘त्या’ जमिनीसाठी सरकारला 2000 कोटी डिपॉझिट करावे लागतील : सोमय्या
- ‘मुंबईत बत्ती गुल झाली यासाठी सरकार अर्नब गोस्वामीला दोष देणार नाही हीच अपेक्षा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

