Share

CM Eknath Shinde : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; विकासकामांना स्थगिती न देण्याची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी हाती घेतली आहे. शिंदे सरकारने मागील काही दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचे काम सुरू केले आहे. तसेच मागील सरकारने घेतलेले अनेक निर्णयही रद्द करण्यात आले आहेत. शिंदे सरकारच्या या निर्णय रद्द करण्याच्या मालिकेमुळे काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक धक्के बसत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

या भेटीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सरकारला राज्याच्या विकासकामांना स्थगिती न देण्याची मागणी करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, हसन मुश्रिफ, दत्तात्रय भरणे हे नेते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला उपस्थित होते. शिंदे सरकारने राज्यअंतर्गत होणाऱ्या अनेक हालचालींना स्थगिती दिली आहे. यामध्ये सहकारी संस्था निवडणुकांनाही ३० सप्टेंबर पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

तसेच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मार्च ते जून २०२२ मधील दरम्यान मंजूर झालेल्या कामांना या सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर ९४१ कोटींच्या नगरविकास विभागाच्या कामांनाही स्थगिती देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला. यामध्ये एकट्या बारामती नगरपरिषदेला २४५ कोटींचे वितरण झाले होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राज्यातील विकास कामांना स्थगिती देऊ नये अशी मागणी करण्यात आल्याची माहिती विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी ट्विटर द्वारे दिली आहे.

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक ठिकाणच्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. कित्येक ठिकाणी तर सहकारी संस्थांमध्ये उमेदवारी अर्जही भरण्यात आले होते. त्यामुळे ज्या ठिकाणी सहकारी संस्थांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत अशा ठिकाणच्या निवडणुकांवरून स्थगिती उठवावी. त्यामुळे त्या सहकारी संस्थांचा मार्गही मोकळा होईल, अशीही विनंती यावेळी करण्यात आल्याचे समजते. मात्र याबाबत शिंदे सरकार कोणता निर्णय घेणार ते पाहणे गरजेचे आहे.

माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत पुरविण्याची मागणी केली होती. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या संबंधितांना भरपाई मिळावी. तसेच राज्यात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे तसेच जीवित हानीही झाली आहे. शेतकरी, सामान्य जनता, व्यापारी वर्ग यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी लोकांनी आपले माणसे गमावले आहेत त्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी यावेळी पवारांनी मुख्यमंत्र्यांना केली.

शेतकऱ्यांच्या पिकांचे ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या घटनेचे पंचनामे करून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी. अनेक ठिकाणी पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. तसेच ग्रामीण भागातील वीज पुरवठाही विस्कळीत झाला आहे. यासाठी भरीव निधी देऊन सामान्य जनतेचे जनजीवन पूर्वस्थितीत आणावे, अशी मागणी अजित पवारांनी पत्राद्वारे केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!